
मुंबई: राज्यात सध्या उन्हाळा तीव्र होत असून काही भागात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती जाणवत आहे. त्यामुळे उर्वरित मे महिन्यातील उष्णतेबरोबरच यंदाचा पावसाळा कसा असेल, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, दक्षिण बंगालच्या उपसागरात तसेच अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेट परिसरात अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मोसमी पाऊस या आठवड्याच्या अखेरीस या भागात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने मंगळवारी वर्तवली आहे.
अंदमान-निकोबार परिसरात अनुकूल स्थिती
हवामान विभागाच्या अंदाजानुसार या आठवड्याच्या अखेरीस अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांमध्ये मोसमी पावसाची चाहूल लागण्याची शक्यता आहे. पाऊस लवकर दाखल झाल्यास अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन नेहमीपेक्षा पाच ते सहा दिवस आधी होऊ शकतं. गेल्या वर्षीचा अपवाद वगळता, अंदमानमध्ये साधारणपणे बावीस मेपर्यंत मान्सून पोहोचत असल्याचे हवामानाचे दाखले आहेत.
गेल्या वर्षी 13 मे रोजी मान्सून दाखल झाला होता. यंदा आठवड्याअखेरीस मान्सून धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी, पुढील प्रवासात अडथळे निर्माण होतात का, यावरही पुढचं चित्र अवलंबून राहणार आहे.
केरळनंतर महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास
हवामान विभागाच्या माहितीनुसार अंदमानात मान्सून स्थिरावल्यानंतर तो हळूहळू भारताच्या दिशेने सरकतो. केरळमध्ये मान्सूनचं आगमन साधारण एक जून रोजी होतं. त्यानंतर साधारण दहा ते बारा दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो, असे आजवरचे हवामानाचे दाखले आहेत.
याच पार्श्वभूमीवर, या आठवड्याअखेरीस अंदमानात मान्सून दाखल झाला आणि त्याच्या पुढील प्रवासात काही अडथळा उभा राहिला नाही, तर महाराष्ट्रात पंधरा ते वीस जून दरम्यान पाऊस दाखल होऊ शकतो. सध्या अनुकूल स्थिती निर्माण झाली असून मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
यंदा पावसावर ‘एल निनो’चं सावट
यंदा देशभरात पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी मान्सून वेळेवर दाखल होण्याची शक्यता असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाने याआधी पहिल्या टप्प्यातील दीर्घकालीन अंदाजात ‘एल निनो’मुळे पावसावर सावट राहण्याची शक्यता व्यक्त केली होती.
त्या अंदाजानुसार, या वर्षीच्या हंगामात सरासरीच्या ब्याण्णव टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यामुळे मान्सूनची वेळ, त्याचा वेग आणि प्रत्यक्ष पावसाचं एकूण प्रमाण याबाबतची उत्सुकता राज्यात वाढली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र
दरम्यान, बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्याची माहिती सोमवारी हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. हवामान विभागानुसार, ही प्रणाली सध्या याच प्रदेशात सक्रिय आहे आणि पुढील काही काळात ती अधिक तीव्र होण्याचा अंदाज आहे.
या प्रणालीमुळे बंगालच्या उपसागराच्या नैऋत्य भागात चक्रीवादळासारखी वाऱ्यांची गोलाकार स्थिती कायम असल्याचंही हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मान्सूनची वाटचाल आणि त्याची पुढील दिशा याबाबतची निरीक्षणं महत्त्वाची ठरणार आहेत.
हवामान विभागाकडून मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मोसमी पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला जातो. त्यानंतरच मान्सूनबाबतचं चित्र अधिक स्पष्ट होईल.
टॅग्ज: #मान्सून #पाऊस #हवामान #महाराष्ट्र #अंदमान #Monsoon #Rain #IMD #Maharashtra #Andaman