
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे श्रीनगर ते कटरा या दरम्यान धावणाऱ्या विस्तारित वंदे भारत एक्सप्रेस सेवेला हिरवा झेंडा दाखवला. या विस्तारामुळे जम्मू-काश्मीरमधील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार असून पर्यटनाला चालना मिळेल.
वंदे भारत एक्सप्रेस ही दिल्ली ते कटरा या मार्गावर धावत होती. मात्र, उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचे काम पूर्णत्वाकडे गेल्याने, या सेवेचा विस्तार आता थेट श्रीनगरपर्यंत करण्यात आला आहे. यामुळे वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आणि काश्मीर खोऱ्यात जाणाऱ्या पर्यटकांना अतिशय वेगवान आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. श्रीनगर ते कटरा हे अंतर आता कमी वेळेत पार करणे शक्य होणार आहे. या रेल्वेमध्ये जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात आल्या आहेत. ही रेल्वे ताशी एकशे साठ किमी वेगाने धावण्यास सक्षम आहे. एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कारमध्ये फिरणाऱ्या खुर्च्या, जीपीएस आधारित प्रवासी माहिती प्रणाली आणि स्वयंचलित दरवाजे आहेत. कवच तंत्रज्ञानाने सज्ज असलेली ही रेल्वे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत प्रगत आहे. हा काश्मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी रेल्वेने जोडण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. डल लेक, गुलमर्ग आणि इतर पर्यटन स्थळांवर जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल.
रेल्वे स्थानकांच्या विकासासोबतच स्थानिक बाजारपेठांना आणि हस्तकलेच्या वस्तूंना मागणी मिळेल. फक्त प्रवासीच नाही, तर काश्मीरमधील सफरचंद आणि इतर उत्पादने देशाच्या इतर भागात जलद गतीने पोहोचवता येतील. अश्विनी वैष्णव यांनी यापूर्वी अनेकदा नमूद केले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशक्ती योजनेअंतर्गत दुर्गम भागांना मुख्य प्रवाहाशी जोडणे हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. श्रीनगर-कटरा वंदे भारत ही सेवा त्याच धोरणाचा एक भाग आहे. या प्रकल्पात जगातील सर्वात उंच रेल्वे पुल चिनाब पूलाचा समावेश असल्याने हे अभियांत्रिकीचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.