केसांसाठी उपयुक्त मेथीदाणे

मेथीदाण्यात फॉलिक अ‍ॅसिड, जीवनसत्व ए, सी आणि के यासारख्या पोषकतत्वांचा समावेश असून केसांची वाढ आणि केसांशी संबंधित समस्यांवर ती गुणकारी ठरतात. मेथीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोहाचे प्रमाण अधिक असते. जे शरीराला आतून आणि केसांना बाहेरून पोषण प्रदान करतात.

केसांच्या समस्यांमधून सुटका मिळण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा कसा उपयोग करून घ्यायचा हे प्रत्येकाला माहीत नसते. केस गळती होत असेल तर मेथी दाण्याचे फायदे होतात. २ चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यानंतर भिजलेले मेथी दाणे त्याच पाण्याचा वापर करून मिक्सरमधून वाटून बारीक करून घ्यावे. हे वाटण केसांना लावावे. साधारण २० मिनिटे तसेच ठेवून त्यानंतर शाम्पूने धुवावेत. चांगल्या परिणामासाठी आठवड्यातून २ वेळा याचा वापर करावा.

कोंड्यासाठी मेथी दाण्याचा अधिक चांगला वापर करता येऊ शकतो. याकरिता दोन चमचे मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी बारीक करून घ्यावेत. त्यामध्ये १ चमचा लिंबाचा रस मिसळून घ्यावा. हे मिश्रण केसांना लावावे आणि ३० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर केस शाम्पूने धुवावेत. असे केल्याने कोंडा लवकर निघून जाईल.
केसांना मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठीही मेथी दाण्याचा उपयोग करता येतो. तसेच यामुळे केसगळतीही थांबते.

केसांचे आरोग्य सांभाळण्यासाठी एक चमचा मेथीचे वाटण आणि १ चमचा नारळाचे दूध मिसळून घ्यावे. हे मिश्रण केसांना मुळापासून लावावे. मिश्रण लावताना बोटांचा वापर करावा.२० मिनिटे तसेच ठेवून मग थंड पाणी आणि शाम्पूने धुवावेत. मेथीतील लोह रक्तप्रवाह चांगला ठेवते आणि केसांची वाढ होण्यास तसेच केस अधिक सुंदर आणि मजबूत होण्यास मदत करते. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळविण्यासाठी आहारामध्येही याचा समावेश करू शकता. मेथी दाण्याचे पाणी पिणेही सोयीस्कर ठरते. हे उपचार वैद्यकीय सल्ल्याने करणे योग्य आहे.






24,959 वेळा पाहिलं