
आपण सुंदर, मोहक, आकर्षक दिसावे, असे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. अनेकजणी त्वचा सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करतात. निरोगी त्वचा मिळविण्यासाठी महागड्या उत्पादनांचा वापर करतात; पण एवढे करूनदेखील काही महिलांना त्वचेच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता. त्वचेसंबंधित समस्या दूर करण्यासाठी साजूक तूप चांगले आहे.
आयुर्वेदात साजुक तुपाचा वापर वर्षानुवर्षे विविध आजार दूर करण्यासाठी सांगितलेला आहे. त्वचेसाठी देखील तुपाचा वापर करु शकता. तुपात असलेले ‘जीवनसत्व ए’ आणि ‘ओमेगा -3’ चे प्रमाण त्वचेला नैसर्गिकरित्या कोमल ठेवण्यासाठी मदत करते. त्वचेवरील कोरडेपणाची समस्याही दूर राहते. यासाठी घरगुती ‘चेहरा कलप’ अधिक उत्तम ठरू शकतो. तुपाचा वापर करून देखील घरच्या घरी हा कलप तयार करू शकता. स्वयंपाकघरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा कलप तयार करता येतो.
बनविण्याची पद्धत खालीलप्रमाणे :
२ चमचे बेसन पीठ, दीड चमचा तूप, १ चमचा गुलाबपाणी या तीन गोष्टी एकत्रित करून चांगले मिश्रण बनवा. त्यानंतर हे तयार मिश्रण चेहऱ्याला लावा. हे मिश्रण सुकल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा. तुपामुळे चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते. नेहमीच तुपाचे २ ते ३ थेंब चेहऱ्याला लावून मसाज केले तर चेहरा अगदी खुलून दिसतो. दररोज चेहऱ्याला देशी तुपाने मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते; परिणामी त्वचेवर चमक येते. त्यामुळे चेहऱ्यावर उत्साह टिकवून ठेवण्यासाठी देशी तुपाचा वापर करू शकता. बहुतांश लोक आपल्या ‘डाएट’मध्ये देखील प्राधान्याने तुपाचा समावेश करतात.