
भाऊ आणि बहिणीचे नाते सर्वात मौल्यवान आहे. या नात्यामध्ये एकमेकांबद्दल प्रेम आणि आपुलकीसोबतच आदराची भावना असणे आवश्यक आहे. अनेकवेळा कळत-नकळत कुटुंबातील वातावरण बिघडून जाते.
हे सुंदर नाते कटुतेने भरू लागते. जर भाऊ-बहिणींमध्ये एकमेकांबद्दल आदराची भावना नसेल, तर ते एकमेकांचे महत्त्व तितक्या गांभीर्याने समजत नाहीत. म्हणूनच लहानपणापासूनच काही सवयी भाऊ-बहिणीत रुजवायला हव्यात. या सवयी अंगीकारून ते या नात्याचा आदर तर वाढवतीलच; शिवाय इतरांसाठी प्रेरणाही बनतील.
‘ताई’ किंवा ‘दादा’ बोलण्याची सवय लावा. मुले नेहमी मोठ्यांचे अनुकरण करतात. अनेक घरांमध्ये असे घडते की, घरातील वडिलधारी मंडळी, मुलांना ज्या नावाने हाक देतात, तेच नाव घेण्याची सवय मुलांना लागते.
तुलना टाळण्याची सवय लावा. घरात दोन मुले असतील तर त्यांची तुलना करणेही घातक ठरू शकते. देखावा, अभ्यास, खेळ यांची कोणतीही तुलना चुकीची आहे. प्रत्येक मूल वेगळे असते, आणि प्रौढांनी हे समजून घेतले पाहिजे. तुलना केल्यास लहानपणापासूनच एखाद्या व्यक्तीमध्ये न्यूनगंड, निराशा आणि राग यासारख्या भावना घर करु शकतात. त्यामुळे भाऊ-बहिणीचे नाते बिघडते. मोठे झाल्यावरही कधी-कधी त्यांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष निर्माण होतो. मुलांना एकमेकांच्या चांगल्या गोष्टींबद्दल सांगा. एकमेकांकडून चांगल्या गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करा.
कामाच्या वाटपात समानता ठेवा. मुलगा असेल तर तो घरची कामे करणार नाही; आणि मुलगी असेल तर बाहेरचे काम करायला जाणार नाही. या भेदभावामुळे भावंडांमध्ये संघर्ष आणि लैंगिक असमानता निर्माण होऊ शकते. विशेषत: आजच्या वातावरणात जेव्हा मुले केवळ शहरातूनच नव्हे, तर देशाबाहेरही अभ्यास आणि नोकरीसाठी जातात, तेव्हा त्यांना आवश्यक ती सर्व कामे शिकवणे अधिक महत्त्वाचे होते. मुलाने कणीक भिजवणे असो; किंवा मुलीला गाडीची ‘स्टेफनी’ बदलायला शिकवणे असो, हे काम त्यांच्यासाठी भविष्यात फायदेशीर ठरेल. त्यांना स्वावलंबी होण्यास मदत होईल. थकून घरी आलेल्या भावाला एक ग्लास पाणी देण्याची सवय तुम्ही बहिणीला लावत असाल तर तीच सवय भावालाही लावा.
प्रेम सारखेच असावे. अनेक घरांमध्ये असे घडते की, मुलीचे लग्न होऊन ती दुसऱ्या घरात जाईल, म्हणून तिला अतिरिक्त सुविधा देऊन तिचे लाड केले जातात. यासाठी भावाला गैरसोय सहन करावी लागली तरी चालेल. दुसरीकडे, अविवाहित भावांना जेव्हा मुलगी लग्नानंतर तिच्या माहेरच्या घरी येते तेव्हा त्यांच्या दिनचर्येशी आणि सोयी-सुविधांसह सर्व प्रकारची तडजोड करण्यास सांगितले जाते. या परिस्थितीमुळे भावंडांमधील अंतर वाढू शकते. मुले एक-दोनदा तडजोडही करतात; पण जेव्हा ही परिस्थिती पुन्हा-पुन्हा उद्भवते, तेव्हा मनात कटुता येऊ लागते. त्यामुळे लहानपणापासूनच दोन्ही मुलांमध्ये समान प्रेमाची सवय लावा. तुमचे प्रेम दोघांसाठी समान आहे, हे त्यांना समजावून सांगा. ज्या काही सुविधा आहेत, त्या दोघांसाठी समान असाव्यात हेही लक्षात ठेवा.
रक्षाबंधन-भाऊबीज यासारख्या सणांचे महत्व समजावून सांगा. सण हे केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक भावनांशी निगडित नसतात. सण माणसाची विचारसरणी, सर्जनशीलता, अभिव्यक्ती तसेच व्यक्तिमत्त्वात सकारात्मकता आणतात. आजच्या धावपळीच्या जीवनात मानवी मूल्यांचा अभाव ही एक मोठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे रक्षाबंधनाचे तसेच भाऊबीज या सारख्या सणांचे महत्त्व मुलांना समजावून सांगा. त्यांना सांगा की हा सण केवळ रक्ताच्या नात्याशी जोडलेला नाही तर मानवी मूल्यांशीही जोडलेला आहे. यामध्ये सुरक्षेची आणि नातेसंबंधांची जबाबदारी दोन्ही भावंडांना बरोबरीने पार पाडावी लागते. ही भावना लहानपणापासून मुलांमध्ये ठेवली तर मोठी झाल्यावरही ही भावना मनात ठेवून ते एकमेकांशी जोडले जातील.