हातमोजे उद्योग

कोविडच्या वेळी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक शब्द जनसामान्यांच्या रोजच्या वापरात रूढ झाले. आपण वैद्यकीय क्षेत्रात रोज वापरात येणाऱ्या मास्क, हातमोजे, सॅनिटायझर, पीपीई कीट, केस झाकायला टोपी यांसारख्या गोष्टी रोज वापरू लागलो. या गोष्टींपैकी शस्त्रक्रियेच्या वेळी वापरले जाणारे हातमोजे म्हणजेच ‘ग्लोव्हज्’ उद्योगाबद्दल जाणून घेऊया. या उद्योगातून मिळणारा नफा हा दिवसेंदिवस वाढत जाणारा आहे. हातमोजे न वापरता शस्त्रक्रिया करणे हे अजूनपर्यंततरी शक्य झालेले नाही. त्यामुळे या उद्योगाला नजिकच्या काही वर्षांत तरी मरण नाही, असं आपण म्हणू शकतो.
शस्त्रक्रियेसाठी वापरात येणाऱ्या हातमोज्यांची निर्मिती ही फक्त एकदा वापरण्यासाठी केलेली असते. म्हणजेच एकदा हातात घातलेले हातमोजे हे फक्त एकाच रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी किंवा तपासणीसाठी आपण वापरू शकतो. तेच हातमोजे आपण दुसऱ्या रुग्णाला वापरू शकत नाही. एकच हातमोजे अनेक रुग्णांसाठी वापरणे अत्यंत धोकादायक मानले जाते. या हातमोज्यांमुळे रुग्णाचे आणि डॉक्टरांचे संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी मदत होते.
शस्त्रक्रियेसाठी वापरले जाणारे हातमोजे उद्योग सुरू करण्यासाठी रबर लेटेक्स, सिलिकॉन किंवा पावडर स्लरी, कॅल्शियम नायट्रेट, कोटिंग पॉलिमर, पाणी हा कच्चा माल आवश्यक आहे. डिपिंग टँक, ग्लोव्ह मोल्ड, हीटिंग टँक (उघड्या स्वरुपात), कन्व्हेयर, लिफ्ट, ओव्हन, पॅकेजिंग मशीन, ग्लोव्ह स्ट्रिपिंग मशीन, ग्लोव्ह बीडिंग मशीन ही उपकरणे गरजेची आहेत. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या हातमोजे तयार करताना उपकरणांचे आणि कच्च्या मालाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. हे हातमोजे बनवताना थोडंही दुर्लक्ष झाल्यास संसर्गाची शक्यता असल्याने हा व्यवसाय उपकरणांवर जास्त आधारित आहे.
या व्यवसायात पूर्वीपासूनच नामांकित उद्योजक राज्य करत असल्याने आपण जेव्हा हा उद्योग नव्याने सुरू करू, तेव्हा बाजाराच्या स्थितीचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. हा उद्योग सुरू करण्यासाठी विविध व्यापार परवान्यांची आवश्यकता आहे. या परवान्यांसोबतच प्रदूषण नियंत्रण महामंडळ, जीएसटी क्रमांक यांचीही नोंदणी महत्त्वाची आहे. या उद्योगाची प्राथमिक स्वरुपात सुरुवात करण्यासाठी उपकरणे, जागा, कामगार, वीज आणि अन्य गोष्टींचा विचार करता किमान ५० लाखांची गुंतवणूक गरजेची ठरते. हा उद्योग सुरू करण्यासाठी बँकांकडे कर्ज योजनाही उपलब्ध आहेत