आरोग्यवर्धक नारळपाणी

नारळपाणी हे एक नैसर्गिक पेय आहे. शरीरासाठी ते अत्यंत गरजेचे आहे. शरीराला ऊर्जा पुरविण्याची क्षमता या पाण्यात असते, म्हणूनच रूग्ण, गरोदर महिलांना नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळपाणी हे मानवजातीसाठी एक वरदान आहे, म्हणून ते आवर्जून प्यावे. नारळाच्या पाण्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता असते. कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या असणाऱ्यांनी नियमित नारळपाणी प्यावे. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाले तर ह्रदयाचे कार्य नक्कीच सुधारू शकते. नारळपाण्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहू शकते.

व्यायाम अथवा अती प्रमाणात शारीरिक हालचाल केल्यावर त्वरित शक्ती मिळण्यासाठी नारळपाणी प्यावे. व्यायाम आणि मेहनतीमुळे शरीरातील ऊर्जा कमी होते. नारळपाण्यामुळे शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. नारळपाण्यामुळे तयार झालेला मूतखडा विरघळण्यासही मदत होते. नारळपाणी पिण्यामुळे ह्रदयाचे विकार होण्याचा धोका टाळता येऊ शकतो.थकवा घालविण्यासाठी नारळपाणी हे नैसर्गिक पेय फायदेशीर आहे. एक कप नारळपाण्यामधून शरीराला ४५ ते ४६ कॅलरीज मिळतात. त्यामुळे नारळपाणी पिणे नक्कीच फायद्याचे ठरते. नारळपाण्यामध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाणही कमी असते.

नारळपाण्यामध्ये पोटॅशिअम आणि इतर अनेक खनिजे असतात. पचनाच्या समस्या असणाऱ्यांनी दिवसभरात एक ग्लास नारळपाणी प्यावे. नियमित नारळपाणी पित असाल तर त्वचेचे योग्य पोषण होते. त्वचेला जीवनसत्व ‘सी’ मिळते. त्यामुळे त्वचा टवटवीत आणि चमकदार होते. नारळपाण्यातील पोषक घटकांमुळे केस मजबूत आणि चमकदार होतात. केस गळणे थांबून केसांची वाढ होते. केसात कोंडा होण्याची समस्या कमी होते. नारळपाणी थंड असल्यामुळे शरीरात अपचन, पित्तामुळे होणारी जळजळ कमी होते. नारळपाण्यामुळे पचनशक्ती सुधारते.






10,489 वेळा पाहिलं