महामार्ग अभियांत्रिकीसाठी भारत-नॉर्वेमध्ये करार

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने नॉर्वेजियन जिओटेक्निकल इन्स्टिट्यूट या नॉर्वेतील भू-तांत्रिक संस्थेसोबत राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. हा करार नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे करण्यात आला. भौगोलिकदृष्ट्या संवेदनशील आणि कठीण भागांमध्ये सुरक्षित व टिकाऊ महामार्ग उभारणीसाठी या कराराचा उपयोग होणार आहे.

या करारानुसार नॉर्वेजियन संस्था बोगदा बांधकाम, उतार स्थैर्य विश्लेषण, भू-तांत्रिक सल्ला, तसेच कार्यरत बोगद्यांच्या संरचनात्मक तपासणी आणि सुरक्षा परीक्षणासाठी तांत्रिक सहाय्य देणार आहे. याशिवाय सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करणे, व्यवहार्यता अभ्यास, उतार निरीक्षण आणि संभाव्य नैसर्गिक धोक्यांचे विश्लेषण यामध्येही मदत केली जाणार आहे.

महामार्ग प्रकल्पांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी उपग्रहाधारित निरीक्षण प्रणाली, पूर्वसूचना व्यवस्था आणि धोक्यांचे पूर्वानुमान विकसित करण्यावरही भर दिला जाणार आहे. विशेषतः डोंगराळ भाग, बोगदे आणि भूस्खलनप्रवण क्षेत्रांमध्ये या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे महामार्गांची सुरक्षितता आणि दीर्घकालीन टिकाव वाढण्यास मदत होईल.

या सामंजस्य करारात संयुक्त कार्यशाळा, तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवाद आणि संशोधन उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे. दोन्ही देशांतील अभियंते आणि तज्ज्ञ यांच्यात ज्ञानाची देवाणघेवाण होऊन नैसर्गिक आपत्ती कमी करण्यासाठी आणि शाश्वत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी नवीन उपाय विकसित केले जाणार आहेत.

हा करार पाच वर्षांसाठी लागू राहणार आहे. याशिवाय दोन्ही संस्था इतर प्रकल्पांवर स्वतंत्रपणे काम करू शकतील. भारत आणि नॉर्वे यांच्यातील पायाभूत सुविधा, शाश्वत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा करार महत्त्वाचा मानला जात आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
7,130 वेळा पाहिलं