पहिली स्वदेशी डेंग्यू लस संशोधित

भारताने वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी झेप घेतली असून, देशातील पहिली स्वदेशी डेंग्यू लस विकसित करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या सुमारास थैमान घालणाऱ्या डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे एक प्रभावी अस्त्र ठरणार आहे. ही लस केवळ भारतासाठीच नाही, तर जागतिक स्तरावर डेंग्यूचा सामना करणाऱ्या देशांसाठी एक आशेचा किरण ठरली आहे. ही लस भारतीय औषध महानियंत्रक आणि विविध संशोधन संस्थांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे. डेंग्यूचे विषाणू हे चार वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आढळतात. त्यामुळे अशी लस तयार करणे आव्हानात्मक होते जी या चारही प्रकारांवर प्रभावी ठरेल. भारतीय संशोधकांनी सौम्य जिवंत लसीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ही लस विकसित केली आहे. यात विषाणूचा कमकुवत अंश वापरला जातो, जो शरीरात गेल्यावर रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, मात्र आजार पसरवत नाही.

लसीच्या वैद्यकीय चाचण्या अत्यंत काळजीपूर्वक पार पडल्या आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये या लसीने मानवी शरीरावर कोणतेही गंभीर दुष्परिणाम दाखवले नाहीत. उलट, स्वयंसेवकांच्या शरीरात डेंग्यूविरुद्ध लढण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रतिपिंडे तयार झाल्याचे दिसून आले. सध्या ही लस तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमधून जात असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांवर तिची परिणामकारकता तपासली जात आहे. भारतात डेंग्यू हा एक गंभीर सार्वजनिक आरोग्य प्रश्न बनला आहे. दरवर्षी लाखो लोक या तापाने फणफणतात आणि पेशी कमी झाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. आतापर्यंत डेंग्यूवर कोणतीही ठोस लस उपलब्ध नव्हती. फक्त लक्षणांवर उपचार केले जात होते. ही स्वदेशी लस उपलब्ध झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण आणि मृत्यूदर लक्षणीयरीत्या कमी होण्याची शक्यता आहे.

विदेशी कंपन्यांच्या लसी महागड्या असू शकतात, मात्र ही लस भारतातच विकसित आणि उत्पादित होणार असल्याने तिची किंमत सामान्यांच्या खिशाला परवडणारी असेल. मेक इन इंडिया मोहिमेतंर्गत ही एक मोठी उपलब्धी मानली जात आहे. ही लस सर्वसमावेशक संरक्षण असून ती डेंग्यूच्या चारही प्रजातींवर प्रभावी काम करते. चाचण्यांमध्ये ही लस पूर्णपणे सुरक्षित आढळली आहे. या लसीमध्ये दीर्घकाळापर्यंत डेंग्यूपासून संरक्षण देण्याची क्षमता आहे.  भारतीय वातावरणात राहणाऱ्या लोकांच्या जनुकीय रचनेचा विचार करून या लसीची निर्मिती करण्यात आलेली आहे. भारताची ही पहिली स्वदेशी डेंग्यू लस लवकरच सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.






21,500 वेळा पाहिलं