काट्टान – विजय सेतुपतीचा रहस्यमयी थरार

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा अष्टपैलू अभिनेता विजय सेतुपती जेव्हा पडद्यावर येतो तेव्हा तो केवळ अभिनय करत नाही तर त्या पात्राला जिवंत करतो. त्याची नवी कोरी वेब सीरिज ‘काट्टान’ हे याचेच एक उत्तम उदाहरण आहे. २७ मार्च २०२६ रोजी जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले असून ही कलाकृती सध्या डिजिटल विश्वात चर्चेचा विषय ठरत असून तामिळनाडूच्या ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा केवळ एका गुन्ह्याचा तपास नसून, मानवी स्वभावाच्या उजव्या आणि गडद बाजूंचा एक रंजक प्रवास आहे. १० भागांच्या या मालिकेत प्रेक्षकांना थरार, रहस्य आणि भावनांचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो.

कथेची सुरुवात एका शांत आणि गुन्हेगारीमुक्त मानल्या जाणाऱ्या गावात एका कापलेल्या मुंडक्याच्या शोधाने होते. धक्कादायक बाब म्हणजे त्या मृत व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय हास्य आहे जे संपूर्ण तपास यंत्रणेला चक्रावून टाकते. तिथून सुरू होतो ‘मुथु’ नावाच्या व्यक्तीचा शोध. मुथु नक्की कोण होता? तो गावाचा रक्षक होता की एखादा क्रूर राक्षस? या प्रश्नांची उत्तरे शोधताना पोलीस प्रशासनाची मोठी कसरत होते. हा तपास रक्षकांना केरळच्या जंगलांपासून ते मानवी मनाच्या तळापर्यंत घेऊन जातो. मुथुचे व्यक्तिमत्व एखाद्या कोड्यासारखे हळूहळू उलगडत जाते जे प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

या सीरिजच्या प्रतिसादाबद्दल बोलायचे झाले तर, प्रेक्षक आणि समीक्षकांनी याला संमिश्र पण सकारात्मक पसंती दिली आहे. अनेक नामांकित व्यासपीठांनी याला ५ पैकी ३ असे मानांकन दिले आहे. कथेतील संथ पण परिणामकारक मांडणी आणि अनपेक्षित वळणे प्रेक्षकांना विशेष भावली आहेत. विजय सेतुपतीचा नैसर्गिक अभिनय आणि मिलिंद सोमणची पडद्यावरील भारदस्त उपस्थिती यामुळे या कलाकृतीची उंची वाढली आहे. मिलिंद सोमणने साकारलेली भूमिका कथेला एक वेगळे गांभीर्य प्रदान करते.

तांत्रिक दृष्टीने विचार केला तर, या मालिकेचे छायाचित्रण आणि संकलन अत्यंत दर्जेदार आहे. ग्रामीण भागातील दृश्ये आणि तिथले वातावरण इतके जिवंत वाटते की प्रेक्षक स्वतःला त्या कथेचा भाग समजू लागतात. संवादांमध्ये उपरोधिक विनोद आणि बुद्धिमत्ता ठासून भरली आहे, ज्यामुळे गंभीर प्रसंगातही एक प्रकारचा जिवंतपणा जाणवतो. प्रत्येक रक्षक अधिकाऱ्याची स्वतंत्र पार्श्वभूमी आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष दिग्दर्शकाने अतिशय नैसर्गिकरीत्या गुंफला आहे.

थोडक्यात सांगायचे तर, ‘काट्टान’ ही मालिका केवळ रक्ताळलेल्या दृश्यांसाठी नाही, तर ती एका माणसाच्या अस्तित्वाचा शोध घेणारी कलाकृती आहे. एक उल्लेखनीय आणि विचार करायला लावणारी गूढ कथा असून ही सीरिज मूळ तामिळ भाषेत असली तरी ती मराठी, हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम अशा विविध भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. जर तुम्हाला संथ गतीने उलगडणारे रहस्य आणि कसदार अभिनय पाहायला आवडत असेल तर ही सीरिज नक्कीच तुमच्या पसंतीस उतरू शकते .

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,614 वेळा पाहिलं