कुणकेश्वर सागरकिनारा

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुणकेश्वर सागरकिनारा हे एक सुंदर ठिकाण आहे. येथील प्राचीन शिवमंदिरामुळे या किनाऱ्यास धार्मिक अधिष्ठान लाभले आहे.

हा भाग स्वच्छ आणि वालुकामय किनारे तसेच डोंगराळ परिसरासाठी ओळखला जातो. स्वच्छ पांढरी वाळू व नयनरम्य दृश्यांसह लांब-स्वच्छ समुद्रकिनारा डोळ्यांना न्याहाळता येतो. आपल्या प्रियजनांसोबत दर्जेदार वेळ घालविण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.

कुणकेश्वर हे एक तीर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ असून हे गाव ‘हापूस आंब्या’साठीसुद्धा प्रसिद्ध आहे. या किनाऱ्यावर दरवर्षी देशी व विदेशी पर्यटक भेट देतात. समुद्रातील जांभ्या दगडांवर सुमारे १०० शिवलिंगे कोरलेली आहेत. ओहोटीच्या वेळी ही शिवलिंगे पाहायला मिळतात. हा फार सुंदर, स्वच्छ , कमी वर्दळ असणारा समुद्रकिनारा आहे.

सूर्यस्नान, पोहणे तसेच जलक्रीडा यांचाही आनंद येथे घेता येतो. एका बाजूला विशाल अरबी समुद्र व दुसऱ्या बाजूला सह्याद्री डोंगर असे नयनरम्य दृश्य येथे असते. खाण्यासाठी येथील चविष्ट स्थानिक पदार्थ तयारच असतात. कोकणचा आणि समुद्राचा मनसोक्त आनंद याठिकाणी घेता येतो.






537 वेळा पाहिलं