गवती चहा

गवती चहा ही मुख्यतः युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका खंडातील उष्णकटिबंधीय तृणवर्णीय वनस्पती आहे. भारतात केरळ, महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये गवती चहाचे पीक घेतले जाते. गवती चहा बारमाही प्रकारातील एक आरोग्यदायी गवत आहे. हलक्या ते भारी जमिनीत हे पीक घेतले जाते. पाणी साचून जमिनीचा निचरा होत नसेल अशा जमिनीत हे पीक घेऊ नये. या पिकासाठी पाण्याचा निचरा होणारी काळी रेताड जमीन योग्य ठरते. या पिकास उबदार आणि उष्ण हवामान मानवते. समप्रमाणात पडणारा पाऊस व भरपूर सूर्यप्रकाश या पिकास पोषक असा ठरतो.
गवती चहाची एकदा लागवड केल्यानंतर हे पीक ४ ते ५ वर्षापर्यंत जमिनीत राहते. लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करून घ्यावी. जमीन चांगली नांगरून भुसभूशीत करून घ्यावी. शेवटच्या नांगरणीवेळी जमिनीत शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. पाण्याची उपलब्धता असल्यास गवती चहाची लागवड वर्षभर करता येते. गवती चहाची लागवड बिया किंवा गवती चहाच्या आलेल्या नवीन फुटव्यापासून करता येते. एका वर्षानंतर गवती चहास अनेक फुटवे येतात. सीकेपी -२५, ओडी-१९, ओडी-२३, ओडी-४४०, ओडी-२५, आरआरएल- १६,प्रगती,कावेरी, कृष्णा आणि निमाया या गवती चहाच्या काही जाती आहेत.
उन्हाळ्यात पाण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. जमिनीत पाणी टिकून राहिल्यास पिकांवर अनिष्ट असा परिणाम होतो. पहिली कापणी लागवडीनंतर ५ ते ६ महिन्यांनी करावी. नंतर सर्व कापण्या २ ते ३ महिन्यांनी फुलोऱ्याआधी कराव्यात. गवती चहाच्या पिकाची कापणी धारदार विळ्याच्या साहाय्याने करतात.
पहिल्या कापणीत प्रति एकर उत्पादन कमी मिळते. दुसऱ्या कापणीपासून मात्र उत्पादनात वाढ होते. पहिल्या वर्षी प्रति एकर ७ ते ८ टन आणि दुसऱ्या वर्षी १० ते १२ टन उत्पादन मिळते. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी १५ ते १८ टनपर्यंत उत्पादन मिळते. नंतरच्या काळात उत्पादन कमी-कमी होत जाते.