गादी बनविण्याचा व्यवसाय

अल्प उत्पन्न गट ते श्रीमंत यांच्याकडे आढळणारी एक सामायिक गोष्ट म्हणजे ‘गादी’! गादीचे प्रकार वेगवेगळे असतील, पण किमान एक गादी सद्यःस्थितीत तरी आपल्याला प्रत्येकाच्या घरात आढळते. काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरात कापूस पिंजून देऊन आपल्या घरासमोरच बसून गादी शिवून देणारा व्यक्ती यायचा. आता वाढत्या शहरीकरणात एखाद्या गावात असा कापूस पिंजून गादी शिवून देणारा व्यक्ती आपल्याला दिसू शकतो. शहरात मात्र गादीच्या दुकानात जाऊन गादी शिवून घ्यावी लागते किंवा मोठ्या ब्रँडच्या दुकानातून तयार गादी विकत घ्यावी लागते. जागतिकीकरण मानवाच्या प्रत्येक गरजेपर्यंत पोहचलेले आहे याचंच हे प्रतीक आहे.
गादी व्यवसाय सुरु करण्यासाठी किमान ४५० स्वे. फूट जागा असणे आवश्यक आहे. कापूस थेट शेतकऱ्यांकडून घेतल्यास तो चांगल्या प्रतीचा आणि स्वस्त उपलब्ध होऊ शकतो. कापसाचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्यातील ग्राहकांच्या गरजेप्रमाणे तुम्ही उपलब्ध करून देऊ शकतात. कापूस खरेदी केल्यावर तो पिंजून त्यातील बिया आणि अन्य कचरा वेगळा करणे, कापूस स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. अंदाजे ८ ते १० किलो कापसापासून एक गादी आणि जर जोडगादी हवी असेल तर १२ ते १६ किलो कापूस गरजेचा असतो.
गादी व्यवसायासाठी मुख्यतः चांगल्या प्रतीच्या कापसाचे विविध प्रकार, कापूस पिंजण्याचे यंत्र, शिलाई यंत्र, वजन काटा, इलेक्ट्रिक मोटर, कात्री, सुई, धागा आणि गादीचे कापड यांची आवश्यकता असते. किमान २ मजूर हे एक गादी बनवण्यासाठी लागतात. गादी बनवणारा मजूर हा कुशल हवाच असे नाही. त्याला फक्त शिलाईचे तंत्र माहिती असेल, तर तो गादी शिवण्यात कुशलता मिळवू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे गादीचे कापड आपल्याकडे उपलब्ध असणे आवश्यक आहे. जेणेकरून ग्राहकांच्या गरजेनुसार त्यांना गादी शिवून देणे शक्य होईल.
गादी व्यवसाय हा काही रोज नवीन गाद्यांची मागणी मिळवणारा व्यवसाय नाही. महिन्यातून किमान १० ते १२ गाद्यांची मागणी येऊ शकते. पण मग बाकीच्या वेळी काय करायचा असा प्रश्न निर्माण झाला, तर बऱ्याचदा ग्राहकांकडे जुनी गादी असते तिच्या कापसापासूनच नवीन गादी तयार करायला सांगतात किंवा कधीकधी ग्राहकांच्या घरी जाऊन गादीचे कापड विरलेले असल्याने ते बदलायचे कामही मिळते. त्यामुळे गादी व्यवसाय हा बारा महिने सुरू राहणारा व्यवसाय आहे. गादी व्यवसाय करताना आपण ग्राहकांना उशी, चादर, गोधडी किंवा ब्लँकेट्स सुद्धा विकू शकतो.
त्याचप्रमाणे सरकारी निवासस्थाने, वसतीगृह, राहण्याची सोय असलेली ठिकाणे, रुग्णालये यांच्याकडून तर दर महिन्याच्या मागणी किंवा गादी डागडुजीची कामेही आपल्याला मिळू शकतात. हल्ली खूप ठिकाणी सोफा असतो, तर सोफ्यासाठी आवश्यक गाद्याही आपण तयार करून देऊ शकतो. हा व्यवसाय आपण शहरी भागात १ लाख रुपयांची प्राथमिक गुंतवणूक करून सुरू करू शकतो.