औषधयुक्त कोथिंबीर

कोथिंबीर शरीराला अनेक फायदे देते आणि शरीरात अनेक गंभीर आजार होण्यापासून रोखते. कोथिंबीर खाण्याचे काय फायदे आहेत, त्याने कोणते आजार टाळले जातात, याबद्दल महत्त्वाची माहिती इथे जाणून घ्या. कोथिंबीरचे गुणधर्म : कोथिंबीर ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे. अनेक आरोग्यविषयक समस्यांना आपल्यापासून दूर ठेवते. कोथिंबीरमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म तसेच रक्तदाब नियंत्रित करणारे गुणधर्म असतात; तसेच ती खनिजसमृद्ध आहे. कोथिंबीर नियमितपणे खाल्ल्याने मज्जासंस्था सुधारते. लघवीशी संबंधित समस्या दूर राहतात. तसेच ‘एपिलेप्सी’ सारख्या आजारातही ती फायदेशीर आहे.

कोथिंबीर केवळ शारीरिक आजारांपासूनच नाही, तर मानसिक विकारांपासूनही रक्षण करते. जे लोक रोज कोथिंबीर खातात, त्यांच्यावर चिंता, तणाव यासारख्या मानसिक समस्या लवकर आघात करीत नाहीत. कोथिंबीर रोगप्रतिकारकशक्ती वाढविते. म्हणजेच यामुळे रोगांशी लढण्याची शक्ती वाढते. यकृत निरोगी ठेवते. रोजच्या आहारात कोथिंबीर समाविष्ट करावी.

आमटी, सार, कढी आणि भाज्यांमध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळावी. कोणतेही पदार्थ कोथिंबीर घालून शिजविले जात नाहीत; कारण असे केल्याने कोथिंबिरीचे नैसर्गिक गुणधर्म कमी होतात. कोथिंबिरीची चटणी बनवून खावी. ओले खोबरे, हिरव्या मिरच्या, मीठ, चिंच, हिरवी कोथिंबीर एकत्र वाटून चटणी बनवावी. ती पचन सुधारते आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्या टाळते. तिसरी पद्धत म्हणजे कोथिंबीर ताक, जलजीरा, कैरीचे पन्हे इत्यादीमध्ये मिसळून खावी. कोथिंबिरीची भाजीसुद्धा छान होते. कोथिंबीरीच्या स्वस्त जुड्या बाजारात मिळू लागल्या की बऱ्याच ठिकाणी भाजी बनवून खाल्ली जाते. तसा प्रयोग आपणही करावा.






4,40,042 वेळा पाहिलं