
अलीकडे पती-पत्नी दोघेही करिअरला प्राधान्य देऊ लागल्याने संपूर्ण दिवस बाहेर कामात जात असतो. घरी आल्यावर स्वतःबरोबर कुटुंबाच्या गरजांना प्राधान्य द्यावे लागते. त्यामुळे व्यक्तीकडे नाती जपण्यासाठी वेळ राहिलेला नाही. परिणामी, लोकांच्या मनातील नात्यांचे महत्त्व कमी झाल्याचे तज्ज्ञ म्हणतात. सध्याच्या महागाईत घर चालवण्यासाठी आणि जीवनशैली जपण्यासाठी पती-पत्नी दोघांनी मिळून कमावणे खूप गरजेचे झाले आहे.
अशा परिस्थितीत अधिकतर समस्या या महिलांना भेडसावतात. लग्नानंतर सासरच्या जबाबदाऱ्या आणि नोकरी सांभाळणे त्यांना अवघड होते. मग घरात विशेषतः सासू आणि सून असे मतभेद सुरू होतात. दोघींच्याही तक्रारी मुलापाशी येतात. कुणाला दुखावणार, या विचारात तो अडकून पडतो.
आई-वडील आणि पत्नी दोघेही महत्त्वाचे असतात. आई-वडिल महत्त्वाचे असतातच पण त्यांच्या संगोपनामुळे जीवनात सक्षमता आलेली असते. आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची काळजी घेणे ही मुलाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. त्याच वेळी, आई-वडिलांइतकीच बायकोही महत्त्वाची आहे. कारण ती तुम्हाला आयुष्यभर साथ देणार असते. तुमची सुख-दु:खे प्रत्येक वेळी वाटून घेणारी भागीदार असते. त्यामुळे दोघांनाही सांभाळून घेणे गरजेचे असते.
लग्नानंतर प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी मनमोकळेपणाने बोलले पाहिजे. तो आयुष्यभर तिच्यावर प्रेम करेल, अशी जाणीव त्याने आपल्या पत्नीला करून दिली पाहिजे. पत्नीची सोबत असल्यानेच काम चांगले करू शकतो, असे तिला सांगितले पाहिजे.
मुलगा पत्नीसाठी भेटवस्तू आणत असेल तर त्याने पालकांसाठीही त्या आणायला हव्यात. जर बायकोला बाहेर फिरायला नेट असेल तर त्याने पालकांनाही फिरायला नेण्यासाठी थोडा वेळ काढला पाहिजे. आई-वडील आणि पत्नीपैकी कोणी आजारी असेल तर त्यांची सारखीच काळजी घेतली पाहिजे.
नवीन आलेली मुलगी आनंदाने राहत असेल, पण तिच्याकडून काही छोट्यामोठ्या चुका होत असतील तर मुलगी समजून त्या पोटात घालणे ही सासू सासऱ्यांची जबाबदारी असते. ज्या कुटुंबात अशी परिस्थिती असते त्या कुटुंबात कोणत्याही नात्यामध्ये अहंकार कधीच येत नाही. ते कुटुंब नेहमी आनंदात असते.