काळजीपूर्वक करावे नेल एक्स्टेंशन

हे फॅशनचे युग आहे ! प्रत्येकजण आपला ‘लूक’ आणि सौंदर्याची विशेष काळजी घेताना दिसतो. मुलगा असो किंवा मुलगी, आजकाल याबाबत खूप जागरूक झाले आहेत. विशेषत: महिला प्रत्येक प्रसंगात आकर्षक दिसण्यासाठी फार मेहनत घेतात. त्यांच्या पोशाखांपासून ते केशभूषा, पादत्राणे या सर्व गोष्टी महिलांना परिपूर्ण हव्या असतात. नखे हा सुद्धा सौंदर्याचा एक भाग आहे. आकर्षक नखांमुळे हातांचे सौंदर्य खुलते. स्वच्छ-सुंदर, सरळसोट नखे सर्वांनाच हवी असतात. नखे सजविण्यासाठी ब्युटिशियनकडे अनेक उपाय असतात. मुली नखांना छान आकार देतात. शिवाय असे नवनवे ‘ट्रेंड’ सहजपणे स्वीकारतात. आजकाल बऱ्याच मुली नखांना ‘परफेक्ट लूक’ देण्यासाठी ‘नेल एक्स्टेंशन’चा अवलंब करताना दिसतात.

पावसाळ्यात नखांचे सौंदर्य वाढविण्यासाठी ‘नेल एक्स्टेंशन’ करतात; म्हणजेच नखे वाढवली जातात आणि त्यांना आकर्षक आकार देऊन ती डिझाईनने सजवली जातात; जेणेकरून ती फार सुंदर दिसतील. आता हे सर्वसामान्य झाले आहे. आपण जर ‘नेल एक्स्टेंशन’ करण्याचा विचार करीत असाल, तर एक आठवड्यासाठी दररोज तेल किंवा ‘मॉइश्चरायझर’ ने नखांना मसाज करा. यासाठी तुम्ही नारळ, बदाम तेल वापरू शकता.

जर तुम्ही नखावरचे ‘नेल एक्स्टेंशन’ काढून टाकले असेल, तर नक्कीच काही दिवस नखांना ‘नेल पेंट’ वापरू नका. गरजेसाठी ‘नेलपेंट’ लावल्यास रात्री झोपण्यापूर्वी काळजीपूर्वक काढून टाका. हे करणे आवश्यकच असते; कारण नखे वाढवल्यामुळे, नखांना हवा उपलब्ध होत नाही. अशा स्थितीत ‘नेल पेंट’ लावल्यास नखे नैसर्गिक हवेच्या संपर्कात येऊ शकणार नाहीत.

‘नेल एक्स्टेंशन’ केल्यामुळे नखे पातळ आणि कमकुवत होतात. त्यामुळे जर तुम्ही ‘नेल एक्स्टेंशन’ करीत असाल, तर त्यानंतर नखांवर ‘नेल स्ट्राँगर’ लावा. तसेच ‘नेल पेंट’ लावण्यापूर्वीही त्याचा वापर करा, जेणेकरून नखे मजबूत राहतील.नखे सुंदर दिसण्यासाठी आधुनिक कलात्मकता गरजेची आहे. अलीकडे नखे सजविण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मुली या पर्यायांचा अवलंब करतात. सौंदर्यप्रसाधनाचे हे उपाय करीत असताना त्याचे विपरित परिणाम शरीराच्या त्या अवयवावर होऊ नयेत, याची दक्षता घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठीच कोणताही उपाय काळजीपूर्वक केलेलाच कधीही चांगला असतो.