
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील एक प्राचीन किल्ला उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात आहे. हा भुईकोट किल्ला आहे. विलक्षण सौंदर्य असलेला हा किल्ला अप्रतिम आहे.तो पाहण्यासाठी पर्यटकांची फार गर्दी दिसते. किल्ल्याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरली असून तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व विभागाकडे या किल्ल्याचा ताबा आहे. पुणे-हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर हा किल्ला आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे जाताना ४८ कि.मी. अंतरावर नळदुर्ग किल्ला मिळतो. पूर्वी या किल्याादचे नाव ‘आलीयाबाद’ असे होते. हे नाव निजामशाही काळात दिले होते. नंतर नळराजाने हा किल्ला काबीज करुन हे नाव बदलले, व त्यास ‘नळदुर्ग’ हे नाव दिले.
सध्याच्या नळदुर्ग किल्ल्याभोवती संरक्षणासाठी लांब खंदक आहे. आतल्या बाजूला दुहेरी तटबंदी आहे. किल्ल्याच्या बाजूच्या पठारावर ‘रणमंडळ’ नावाचा तटबंदीने युक्त असा भाग आहे. येथील खंदकात नदीचा प्रवाह अडवून तो वळवून आणण्यात आला. या खंदकामध्ये कायमस्वरूपी पाणी साठून राहते. त्यामुळे या बाजूने शत्रूला किल्ल्यामध्ये शिरकाव करता येत नाही.
या किल्याण्वर टेहळणीचा बुरूज, त्यावरील लांब तोफ, धबधबा व दरवाजाचा वक्राकार मार्ग आहे. आतमध्ये बुरुजांनी जोडलेली भक्कम तटबंदी आहे. हैद्राबाद महामार्गाच्या बाजूला असलेल्या तटबंदीमध्ये हा बुरूज आहे. रणमंडळ आणि नळदुर्ग यांना जोडणाऱ्या बंधाऱ्यामध्ये जलमहाल आहे. हा बंधारा १९ ते २० मीटर उंच आहे. बंधाऱ्यामध्ये चार मजले आहेत. भिंतीवर फारशी लिपीतील शिलालेख आहे. पावसाळ्यामध्ये पाणी वाढल्यावर या बंधाऱ्यामधून वाहून जाण्यासाठी दोन मार्ग ठेवलेले आहेत.