अत्तर निर्मिती व्यवसाय

घरातील दैनंदिन काम संपल्यानंतर जो फुरसतीचा वेळ उरतो, तो वेळ स्त्रिया अनेकदा गप्पाटप्पा करण्यात किंवा टीव्हीवरील मालिका पाहण्यात घालवतात. वेळेचा सदुपयोग करून स्वत:साठी आणि कुटुंबासाठी चांगले उत्पन्न मिळविण्याकरिता अत्तर तयार करण्याचा व्यवसाय निवडू शकता. बाजारात मागणी असणारा आणि माल नाशवंत नसणारा असा हा व्यवसाय आहे. बाराही महिने ग्राहकांना उपलब्ध असलेला हा व्यवसाय कमी भांडवलात अधिक उत्पन्न देतो. हा उद्योग अर्धवेळ किंवा पूर्णवेळ उद्योगाच्या रूपात करता येऊ शकतो. महिला आणि पुरुष घरातील कामे, नोकरी करून हा व्यवसाय करू शकतात. हा लघुउद्योग खूप फायदेशीर आणि निश्चितपणे नफा देणारा आहे.
उत्पादनाचा जितका विस्तार होईल तितका पैसा उद्योगात गुंतवता येईल. जर तुमच्याकडे पैसे गुंतवण्याची क्षमता नसेल, तर तुम्ही तुमच्या घरात गृहोद्योग म्हणून अल्प भांडवलात हा व्यवसाय सुरू करू शकता. अत्तर तयार करण्यासाठी फारशी यंत्रसामग्रीची गरज नसली तरीही, बाटल्या, स्वयंचलित वेष्टनबंद यंत्र गरजेचे असते. उत्पादन कमी प्रमाणात असल्यास बाटल्यांचे झाकण हाताने लावून बंद करता येते.परफ्यूम तयार करण्याची सूत्रे साधारणपणे सारखी असतात. ते मिश्रण विशिष्ट प्रमाणात मिसळले की वेगवेगळ्या सुगंधाचा फॉर्म्युला तयार होतो. अत्तर 100 मिली घ्या. त्यात 200 मिली अल्कोहोल मिसळा. त्या मिश्रणात 20 मिली फिक्सर घाला. ज्या आकारात हे मिश्रण बसेल त्या आकाराची बाटली घेऊन मिश्रण चांगले हलवा. असे मिश्रण बंद करून किमान 1 किंवा 2 दिवस बाटलीत ठेवा.
विक्रीसाठी बंद करण्यापूर्वी सुती कापड किंवा फिल्टर पेपरमधून मिश्रण गाळून घ्या. बाजारात विक्रीसाठी असलेल्या प्रतिस्पर्धी उत्पादनांच्या किंमती बघून घ्या. अत्तर 5, 10, 20 मिलीच्या बाटल्यांमध्ये भरावे. स्प्रे अत्तर असेल तर ते तयार मिश्रण स्प्रे अत्तराच्या बाटल्यांमध्ये भरावे. तुम्ही दिलेल्या नावासह तुमचे ‘लेबल’ करा. टू-इन-वन, थ्री-इन-वन अशा स्वरूपात 2-3 सुगंध एकत्र मिसळून बाजारात आणावेत. ग्रामीण, शहरी, गरीब, श्रीमंत अशा सर्व प्रकारच्या ग्राहकांना अत्तर उपलब्ध आहे. मॉलपासून ते पानवाल्याच्या टपरीपर्यंत अत्तरांना ग्राहक मिळतात. जेव्हा लोक इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी जातात, तेव्हा त्यांना समोर एखादी वस्तू दिसली की ती खरेदी केली जाते. म्हणून, जेथे अत्तर विक्रीसाठी काउंटर उपलब्ध असतील, तेथे ग्राहकांना सहज दिसणारे फलक लावावेत.
अत्तर अशा प्रकारे ठेवावे की ग्राहक दुकानात प्रवेश करताना परफ्यूमची बाटली दिसेल. तुमच्या उत्पादनाचे सर्वात मोठे ग्राहक मॉल्स, सुपर मार्केट, अगरबत्ती व्यापारी, केमिकलची दुकाने, घाऊक सेंट व्यापारी असतील. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून आगावू मागणी घेऊ शकता. त्यांच्यापर्यंत माल पोहोचवू शकता. वस्तूंचे उत्पादन करून वस्तू घाऊक किंमतीत दिल्यास मालाची रोख विक्री होते. मालाची विक्रीही जास्त असून दुकानदारांना माल विकण्यासाठी काउंटरवर विनंतीही करावी लागत नाही. विविध फुलांचा सुगंध असलेले मोगरा, गुलाब, जुई अशी अत्तरे, सुगंधी तेल, सुगंधी रसायने, पॅकिंगसाठी छोट्या-मोठ्या बाटल्या, कुप्या, कापूस, बाटलीच्या टोप्या, लेबले, स्टिकर्स हा कच्चा माल यासाठी आवश्यक असतो. त्याचप्रमाणे, अत्तर मिसळण्यासाठी आपल्याला लहान किंवा मोठ्या बाटल्या लागतील.