नोकरी सोडून शेतीतून लाखोंचा नफा

बदललेले तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोग करून पाहण्याची हौस याच्या जोरावर भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील खेमराज भुते या तरुणाने कोरफडीचे उत्पादन घेतले. खेमराज औषध निर्मिती कंपनीमध्ये नोकरीला होता. नोकरी करताना वडिलोपार्जित जमिनीत काहीतरी नवीन करून बघण्याच्या इच्छेने त्याने कोरफडीची लागवड केली. त्यातील नफा बघता त्याने नोकरी सोडली आणि गावातच कंपनी काढली.
त्याने उत्पादित केलेल्या कोरफडीचा रस, जेल, खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने यांना फक्त भारतातूनच नव्हे, तर जगभरातून मागणी आहे. या कोरफडीच्या शेतीत खेमराज यशस्वी ठरला. अनेक नवनवीन कंपन्या या थेट त्याच्याकडे उत्पादन घ्यायला येऊ लागल्या.
पारंपरिक शेतीपिके न घेता खेमराजने उचललेले कोरफड शेतीचे पाऊल खरोखरच नाविन्यपूर्ण म्हणायला हवे. फक्त शेतीतून उत्पादन न घेता स्वतःचा लघुउद्योग स्थापन केल्याने गावातील १५ ते २० जणांना रोजगार मिळाला. खेमराजने कोरफडीपासून तयार केलेल्या उत्पादनांची किंमतही सामान्य माणसाच्या खिश्याला परवडेल अशी ठेवलेली असल्याने भारतभरातूनच नव्हे, तर जगभरातून त्याच्या उत्पादनांना मागणी आहे.
साडेतीन एकराच्या जमिनीत कोरफडीसाठी अंदाजे ६५ हजार रुपये गुंतवून आज खेमराज तब्बल ३ लाख रुपयांचा नफा कमावत आहे. पहिला प्रयोग यशस्वी झाल्याने खेमराजने गावातील एकरभर जमीन भाड्याने घेतली असून त्यातही त्याने कोरफडीची लागवड केली आहे.