रोहिडा किल्ला

सातारा जिल्ह्यातील भोर तालुक्यात ‘रोहिडा’ किल्ला आहे. याला ‘विचित्रगड’ असेही म्हणतात. हा गड पाहण्यासाठी प्रथम संस्थानकालीन भोरला जावे लागते. येथून बसने ‘रोहिडा’ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘बाजारवाडी’ गावात पोहोचता येते. गावात पोहोचल्याबरोबर पश्चिमेकडे पाहिले असता तटबंदी आणि बुरूजांनी नटलेला ‘रोहिडा’ दिसतो. या गडावर जाण्यासाठी सोपी चढण आहे.

बाजारवाडी येथून मळलेल्या ठळक पायवाटेने गेल्यावर तासाभरात गडाच्या पहिल्या दरवाज्याजवळ पोहोचता येते. भोरच्या रायरेश्वर प्रतिष्ठानने या किल्ल्यावरील बहुतांशी वास्तूंचा जीर्णोध्दार केला आहे. पहिल्या दरवाज्याच्या माथ्यावर गणेशपट्टी आहे. हा दरवाजा पार केल्यानंतर दोन्ही अंगास प्राण्यांची शिल्पे असलेला दुसरा दरवाजा मिळतो. या दरवाज्यातून आत गेल्यावर कातळात खोदलेले सुमधुर पाण्याचे तळे असून हे बारमाही आहे. येथून थोडे पुढे गेल्यानंतर भक्कम बांधणीचा गडाचा तिसरा दरवाजा लागतो.

प्रवेशद्वाराच्या भिंतीवर दोन्ही बाजूस गजमुखांची शिल्पे असून डाव्या हातास मराठी शिलालेख आणि उजव्या हातास फारसी शिलालेख कोरलेले दिसतात. दोन्ही शिल्पे सरस आहेत. गडावर फत्तेबुरूज आहे. हा बुरूज पाहून सदरेच्या मागच्या बाजूला गेल्यानंतर दगडी बांधणीचे ‘रोहिडमल्ला’चे मंदिर आहे. या मंदिरात गणपती आणि भैरवाच्या मूर्ती असून समोरच एक लहानसे तळे, दीपमाळ आहे. रोहिडा किल्ल्यास एकूण 7 बुरूज आहेत. त्यातील ‘शिरवले’ आणि ‘वाघजाई’ हे बुरूज भक्कम लढाऊ बांधणीचे आहेत. येथेच एका तळ्याजवळ शिवलिंग आणि मानवी मूर्ती जमिनीलगत बसवलेली आहे. गडफेरी व्यवस्थित करण्यासाठी 2 तास पुरेसे ठरतात.






235 वेळा पाहिलं