रबर शिक्का निर्मिती उद्योग

कोणत्याही कार्यालयीन कामकाजात शिक्क्याला महत्त्व असते. तुम्ही अनेक ठिकाणी ऐकलं असेल की, “या पत्रावर स्टॅम्पची गरज आहे” आणि त्या पत्रावर काम मिळाला की ते कामही चटकन होऊन जाते. तर अशा या ‘रबर शिक्का’ उद्योगाबद्दल जाणून घेऊ.
बाजारात दोन प्रकारच्या रबर शिक्क्यांना मागणी आहे. पहिला प्रकार म्हणजे रबरावर नक्षीदार नक्षीकाम असते. या शिक्क्यासाठी शाई सोबत ठेवावी लागते, तर दुसऱ्या प्रकारात फोमवर अक्षरे छापली जातात. त्यामुळे आपल्याला शाई स्वतंत्रपणे बाळगावी लागत नाही.
रबर शिक्का उद्योग सुरू करण्यासाठी पॉलिमीटर शीट, बटर पेपर, शाई, फोम, स्टॅम्प हँडल, स्टॅम्प चिकटवण्यासाठी गोंद हा कच्चा माल लागतो. त्याचप्रमाणे फ्लॅश स्टॅम्प मशीन, संगणक, लेजर प्रिंटर आणि कात्री ही यंत्रे हाताशी असणे गरजेचे आहे. रबर शिक्का उद्योग सुरू करण्यासाठी तुम्हांला परवाने आवश्यक आहेत. जी एस टी नोंदणी क्रमांक आणि एम एस एम ई नोंदणी हे परवाने काढल्यावर तुम्ही हा उद्योग सुरू करू शकतात.
हा उद्योग तुम्ही घरबसल्या सुरू करू शकतात. जाहिरातीच्या जोरावर तुमच्याकडे शिक्क्याची मागणीही नोंदवली जाऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्ही या उद्योगासाठी दुकान घेण्याच्या विचारात असाल, तर दुकानाची जागा ही शाळा, महाविद्यालय, शासकीय व खाजगी कार्यालय यांच्या आसपासच्या परिसरातील असावी. या उद्योगासोबत तुम्ही जोडव्यवसायाच्या दृष्टिकोनातून स्टेशनरी व्यवसायाचाही विचार करू शकतात.
कच्चा माल, यंत्रसामुग्री, उद्योगासाठी भाडेतत्त्वावर घेतलेली जागा यासाठी कमीत कमी 1 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक गरजेची आहे. रबर शिक्का बनवायला येणारा खर्च ५० रुपयांपर्यंत येतो, पण एक रबर शिक्का बाजारात आपल्याला सुमारे २५० रुपयांपर्यंत विकता येतो. या उद्योगातून दर महिन्याला १५ ते २० हजारांपर्यंतचा निव्वळ नफा आपण कमवू शकतो.