स्टारशिप आवृत्ती तीनचे यशस्वी उड्डाण

अमेरिकेतील ‘स्पेसएक्स’ या खासगी अवकाश संशोधन कंपनीने ‘स्टारशिप’ या महाकाय प्रक्षेपकाच्या ‘आवृत्ती तीन’ची बारावी चाचणी मोहीम यशस्वीरीत्या पार पाडली. इलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखालील या मोहिमेचे प्रक्षेपण अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ‘स्टारबेस’ केंद्रातून करण्यात आले. सुरुवातीला तांत्रिक अडचणीमुळे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते; मात्र नंतर सायंकाळी यशस्वी उड्डाण करण्यात आले. या मोहिमेकडे जगभरातील अवकाश संशोधक आणि वैज्ञानिकांचे विशेष लक्ष लागले होते.

या मोहिमेत ‘सुपर हेवी’ नावाचा प्रबळ प्रक्षेपण टप्पा आणि ‘स्टारशिप’ हे अवकाशयान वापरण्यात आले. या प्रक्षेपकात तब्बल तेहतीस ‘रॅप्टर’ इंजिनांचा वापर करण्यात आला असून, ही आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली अवकाशवाहक प्रणाली मानली जाते. उड्डाणानंतर काही मिनिटांत दोन्ही टप्पे वेगळे करण्यात आले. त्यानंतर ‘सुपर हेवी’ने नियोजित पद्धतीने समुद्रात उतरण्याचा प्रयत्न केला, तर वरचा ‘स्टारशिप’ टप्पा पृथ्वीभोवतीच्या उड्डाण मार्गावर पुढे सरकला. या मोहिमेदरम्यान बावीस नमुना उपग्रहही अवकाशात सोडण्यात आले.

चाचणीदरम्यान काही तांत्रिक अडचणीही समोर आल्या. ‘स्टारशिप’च्या सहा इंजिनांपैकी एका इंजिनात बिघाड झाला; मात्र उर्वरित इंजिनांनी भार सांभाळत उड्डाण सुरू ठेवले. अवकाशयानाच्या उष्णतारोधक संरचनेची क्षमता तपासण्यासाठी काही भागांवर विशेष प्रयोग करण्यात आले होते. पृथ्वीच्या वातावरणात पुनःप्रवेश करताना अवकाशयान अतिशय प्रखर तापमानातून गेले; तरीही ते अखेर हिंदी महासागरात नियंत्रित पद्धतीने उतरवण्यात आले. अंतिम टप्प्यात अवकाशयानाला आग लागल्याचे दृश्यही समोर आले; मात्र ही चाचणी नियोजनानुसार पार पडल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

‘स्टारशिप आवृत्ती तीन’मध्ये आधीच्या आवृत्त्यांच्या तुलनेत मोठे तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. अधिक शक्तिशाली इंजिने, वाढीव इंधन क्षमता, सुधारित पुनर्वापर प्रणाली आणि नव्या प्रक्षेपण पायाभूत सुविधांचा या मोहिमेत वापर झाला. टेक्सासमधील ‘स्टारबेस’ येथील दुसऱ्या प्रक्षेपण मंचावरून ही पहिलीच मोठी चाचणी होती. भविष्यात या प्रणालीद्वारे पृथ्वीभोवती मालवाहतूक, चंद्र मोहिमा आणि मंगळ ग्रहावर मानव पाठविण्याची तयारी केली जात आहे.

अमेरिकेची अवकाश संस्था ‘नासा’ देखील या प्रणालीकडे आशेने पाहत आहे. आगामी ‘आर्टेमिस’ मोहिमांमध्ये चंद्रावर अंतराळवीर उतरवण्यासाठी ‘स्टारशिप’चा वापर करण्याची योजना आहे. भविष्यात मंगळ ग्रहावर मानवी वसाहत निर्माण करण्याचे स्वप्नही इलॉन मस्क यांनी व्यक्त केले आहे. अनेक अपयश आणि स्फोटांनंतरही ‘स्पेसएक्स’ने या मोहिमेद्वारे मोठी झेप घेतल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे खाजगी अवकाश संशोधन क्षेत्रात नवे युग सुरू होत असल्याची चर्चा जगभर रंगू लागली आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
24,567 वेळा पाहिलं