
पोह्यांसाठी साहित्य : पोहे २ कप, तेल १ मोठा चमचा, मोहरी १ लहान चमचा, जिरे १ लहान चमचा, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या १-२, शेंगदाणे पाव कप, कांदा अर्धा कप (उभा चिरलेला), हळद अर्धा लहान चमचा, साखर १ लहान चमचा, मीठ चवीनुसार, उकडलेल्या एका बटाट्याचे मध्यम आकाराचे तुकडे, लिंबाचा रस १ लहान चमचा, कोथिंबीर १ मोठा चमचा.
तर्रीसाठी साहित्य : हरभरा २ कप (भिजवलेलेला), मीठ चवीनुसार, तेल, खोबरे अर्धा कप, कांदे २-३ मध्यम आकाराचे (चिरलेले), टोमॅटो २-३, लसूण ५-६ पाकळ्या, आले १ इंच तुकडा, दालचिनी १ इंच, हिरवी वेलची ३-४, काळी वेलची १-२, लवंग ४-५, काळे मिरे – ४-६, तमालपत्र २-३, आमचूर पावडर – १ लहान चमचा, मोहरी १ लहान चमचा, जिरे १ लहान चमचा, हिंग १ लहान चमचा, हळद अर्धा लहान चमचा, लाल तिखट ४ मोठे चमचे, कोथिंबीर ,जिरा पावडर १ लहान चमचा, काळा मसाला – २ लहान चमचा, मीठ चवीनुसार, पाणी
कृती : सर्वप्रथम तर्री बनवण्यासाठी आदल्या रात्री हरभरा भिजत घाला. दुसऱ्या दिवशी ते चांगले धुवून घ्या आणि कुकरमध्ये ठेवा. आता त्यात चवीपुरते थोडे मीठ आणि पाणी टाकून शिजवा. कुकरच्या २ ते ३ शिट्या करा. कुकर थंड झाल्यानंतर त्यातील हरभरे काढून घ्या. त्याचे पाणी फेकू न देता ते एका बाजूला ठेवा. आता तर्री बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात खोबरे टाकून ते तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या. आता त्यात कांदा, आले, लसूण टाका. हे नीट शिजल्यानंतर सर्व खडा मसाला टाका. २ मिनिटे मध्यम आचेवर नीट भाजून घ्या. आता गॅस बंद करून हे थंड होऊ द्या. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेवून बारीक वाटण करा.
आता त्याच पॅनमध्ये अजून अर्धा कप तेल घ्या. तेल गरम करा आणि त्यात जिरे, मोहरी, तमालपत्र आणि हिंग घाला. आता त्यात तयार केलेले वाटण घाला. सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. आता गॅस कमी करा आणि त्यात तिखट, हळद, मीठ घालून छान मिसळून घ्या. मसाल्यातून तेल वेगळे होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता त्यात शिजलेले चणे, ताजी चिरलेली कोथिंबीर घालून २-३ मिनिटे शिजवा. त्यात हरभऱ्याचे पाणी आणि थोडे अजून पाणी घाला. उकळी येईपर्यंत शिजवा. तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. नंतर आमचूर पावडर घाला, मिसळून घ्या, उकळी आणा. मध्यम आचेवर किमान २०-२५ मिनिटे शिजवा. कोथिंबीरीने सजवा.
नेहमीचे कांदे पोहे बनवता तसे कांदे-पोहे बनवा. एका प्लेटमध्ये कांदे पोहे घ्या. त्यावर ही तयार केलेली तर्री टाका. त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून सजवा. सोबत लिंबाची फोड देऊन खाण्यास द्या.