मुलांना स्वयंपाक कला शिकवा

स्वयंपाक ही एक कला आहे. याचे ज्ञान प्रत्येक व्यक्तीला असणे आवश्यक आहे. या कलेचे ज्ञान नसेल तर अन्नासाठी दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागून नुकसानच जास्त होईल. पालकांनी लहानपणापासूनच मुलांना छोट्या-छोट्या गोष्टी करायला शिकवल्या पाहिजेत. मुलांचे लाड करण्याच्या ओघात त्यांना काम कसे सांगावे, अशा विचाराने त्यांचा अगदीच ‘बाबू’ करु नका. त्यामुळे मुल एका चांगल्या कलेपासून दूर राहते. जर आपल्या मुलाला स्वयंपाक करायला शिकवायचा असेल, तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील; जेणेकरून मूल आपली सुरक्षितता लक्षात घेऊन स्वयंपाक करायला शिकू शकेल. यासाठी वेळ काढण्याची गरज नाही. जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करीत असता, तेव्हा मुलांना तुमच्या देखरेखीखाली ठेवावे. हळूहळू तुम्हाला पाहताना मूल स्वतःच स्वयंपाक करायला शिकेल.

जी मुले जेवायला नाखूष असतात त्यांना स्वयंपाक करताना तुमच्यासोबत ठेवल्याने त्यांच्यात अन्नाची आवड निर्माण होते. तुमचे मूल 4 ते 5 वर्षांचे असताना त्याला स्वयंपाकघरात आणणे सुरू करा. स्वयंपाक केल्याने मुलांचा बौद्धिक आणि शारीरिक विकास होण्यास मदत होते. मुलांना विविध प्रकारच्या भाज्या, धान्ये, फळे, मसाल्यांची माहिती मिळते. स्वयंपाक करताना त्यांना या सर्व गोष्टी दाखवत रहा. मुले स्वयंपाकघरात असताना भाज्या धुणे, सोलणे, कापणे, पिळणे यासारख्या अनेक गोष्टी शिकतात, जे त्यांच्यासाठी नवीन अनुभव असतात. यामुळे मुलांच्या अंगी स्वयंपाक बनविण्याची एक चांगली कला आपोआप विकसित होत जाते.

स्वयंपाक बनविताना मोजमाप करून पदार्थ बनविल्याने पदार्थ रुचकर होतात. तशीच मुलांची गणितातील रुची वाढते. त्यांना अंकगणना चांगल्या प्रकारे करता येते. मुलांना जेवणाचे टेबल सजवायला शिकवा. ताट, ग्लास, वाट्या आणि चमचे ठेवण्याची योग्य जागा दाखवा. यामुळे त्यांच्यात व्यवस्थापनाचे गुण येतील. जेव्हा मूल किमान 14 वर्षांचे असेल, आणि त्याला विद्युत उपकरणांशी संबंधित खबरदारीची जाणीव असेल, तेव्हाच विद्युत उपकरणे वापरण्यास द्या.