दाक्षायणी देवीचे मंदिर

औरंगाबादमध्ये दाक्षायणी देवीचे सुंदर मंदिर आहे. हे मंदिर लासूर गावात ‘शिवना’ नदीच्या काठावर असून निसर्गरम्य आहे. दाक्षायणी देवी लासुर गावचे आराध्य दैवत व वैजापुर तालुक्याचे ग्रामदैवत आहे. डोक्यावर चांदीचा मुकूट आणि अंगभर दागिने परिधान केलेली देवीची मूर्ती प्रसन्न आहे. देवीच्या मंदिरासमोर मोठा सभामंडप आहे. देवीच्या मूर्तीसमोर वाघाची मूर्ती असून ती एका अंखड दगडी शिळेत कोरलेली आहे. बाजूला कासवाची मूर्तीही आहे. वर्षातून दोन वेळा गावात मोठा उत्सव पार पडतो. एप्रिल-मे महिन्यात मोठी यात्रा आणि नवरात्रीत नऊ दिवस मंदिर भक्तांनी गजबजलेले असते. दाक्षायणी देवी ही दक्ष राजाची कन्या आहे. या देवीच्या लासुर गावात प्रकट होण्याची कथा सांगितली जाते. दाक्षायणी देवीचा आई-वडिलांकडून अपमान झाल्यावर तिने पुत्रकामेष्टी यज्ञात उडी घेतली. त्यानंतर शंकराने जटा आपटून तांडव केले.

लोकांच्या नवसाला पावणारी देवी अशी भक्तांमध्ये ओळख आहे. नववधू या देवीचा आशीर्वाद घेऊन सुखी संसाराला सुरुवात करतात. मंदिराचे बांधकाम पूर्वी हेमाडपंथी होते. देवीच्या मंदिरासमोर एक दीपमाळ आहे. त्यावर कोरलेल्या वाघाच्या मूर्ती लक्षवेधक आहेत. मंदिराच्या मध्यभागी छतावर कोरलेले सुंदर कमळ आहे. मंदिरावरील नक्षीकाम देखणे आहे. या मंदिराला एक मुख्य कळस आणि तीन उपकळस आहेत. मंदिराच्या रस्त्यावर अनेक दुकाने आहेत. या मंदिराची गावकरीच देखभाल करतात. लासूर गावी औरंगाबादहून रेल्वे, बस व खासगी वाहनाने जाता येते. हे क्षेत्र औरंगाबादहून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे.