चारठाणातील मंदिरे

महाराष्ट्राच्या अनेक भागांमधील मंदिरांची वास्तुरचना खरोखरच डोळे दिपविणारी अशी आहे. परभणीतील जिंतूर तालुक्यात अशी काही सुंदर मंदिरे पहायला मिळतात. त्यात चारठाणा गावाचा उल्लेख करता येईल. येथे अनेक मंदिरे असून ती पुरातन असल्याने पाहण्यासाठी पर्यटकही आवर्जून जातात. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती आहे. चारठाणा हे एक लोकप्रिय धार्मिक स्थळ आहे. येथे पर्यटकांना शिवमंदिर, गोकुळेश्वर, काशीविश्वेश्वर, श्री नृसिंहतीर्थ मंदिर, दगडी बांधकामाची अष्टकोनी बारव, झुलता मनोरा ही महत्त्वाची स्थळे पहायला मिळतात.

गावातील ‘चारुशयना’ नदीच्या काठावर नृसिंहतीर्थ मंदिर आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. नदीकाठी असलेल्या दगडी पायऱ्यांचे काही अवशेष आता दिसतात. एका प्रशस्त आवारात हे मंदिर आहे. मंदिरासमोर सभामंडप आहे. हा सभामंडप १६ खांबांवर उभा असल्याने हे मंदिर ‘सोळा खांबी नृसिंह मंदिर’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. गाभाऱ्यात शिवलिंग आहे. मंदिरासमोरील नदीच्या पात्रात काही ठिकाणी खोल डोह झाले आहेत. असे म्हणतात की, तिथे प्राचीन नाणी सापडतात. येथेच एक जोड मंदिर आहे. त्यातील एक देवीचे व दुसरे महादेवाचे मंदिर आहे. देवीच्या देवळाचा सभामंडप महादेवाच्या देवळापेक्षा वेगळा आहे.

मंदिरात जास्त कोरीव काम केलेले नसले तरी हे मंदिर देखणे आहे. ही मंदिरे पाहण्यासाठी भाविक आवर्जून भेट देतात. श्री काशीविश्वेश्वर आणि रेणुका देवीची मंदिरे जोडलेली आहेत. याच गावात गोकुळेश्वर मंदिर असून प्रथमदर्शनी ते एका भव्य वाड्यासारखे दिसते. या गावचे ग्रामदैवत असणारे हे हे शिवमंदिर पश्चिमाभिमुख आहे. हे मंदिरही आकर्षक आहे. या गावात जुनी कौलारू घरे पहायला मिळतात. चारठाणा हे गाव जिंतूरपासून २० किमी आणि परभणीपासून ६२ किमी अंतरावर वसलेले आहे. येथे जरयचे झाल्यास ‘सेलु’ हे सर्वात जवळील रेल्वे स्थानक आहे. सेलुपासुन चारठाणा अवघ्या २० किमीवर आहे.