लष्कराची पहिली ऐतिहासिक समुद्र मोहीम

भारतीय भूदलाच्या इतिहासात आज एका सुवर्ण अध्यायाची भर पडली आहे. सैन्याने आपल्या पहिल्या ब्लू वॉटर नौकानयन मोहिमेचा, म्हणजेच समुद्र साहसचा अधिकृतपणे प्रारंभ केला आहे. दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी मुंबईतील नौदल गोदी येथून या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. ही मोहीम केवळ साहसी नसून, भारतीय लष्कराची अष्टपैलू क्षमता आणि अथांग समुद्रातही टिकून राहण्याचे त्यांचे धैर्य जगासमोर मांडणारी ठरणार आहे.

समुद्र साहस ही मोहीम भारतीय लष्कराच्या सैन्य नौकानयन केंद्र आणि पूर्व कमान यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. भारतीय लष्कर प्रामुख्याने जमिनीवरील युद्धासाठी ओळखले जाते, मात्र या मोहिमेद्वारे लष्कराच्या जवानांचे कौशल्य समुद्राच्या आव्हानात्मक परिस्थितीतही तपासले जाणार आहे. ही मोहीम मुंबईहून सुरू होऊन भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरून अरबी समुद्रातून प्रवास करत लक्षद्वीप बेटांपर्यंत जाईल आणि पुन्हा कोचीमार्गे परत येईल. या मोहिमेसाठी विशेष प्रकारच्या कापडी नौकेचा वापर केला जात आहे, ज्या पूर्णपणे वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असतात. जवानांमध्ये नेतृत्वगुण, सांघिक कार्य आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी समुद्रात तग धरण्याची क्षमता विकसित करणे हा यामागचा मुख्य हेतू आहे.

साधारणपणे ब्लू वॉटर मोहिम या नौदलाशी संबंधित असतात. मात्र, भारतीय भूदलाने अशा प्रकारची मोहीम हाती घेणे हे त्यांच्या वाढत्या सामरिक कक्षांचे प्रतीक आहे. या मोहिमेसाठी देशभरातील लष्करी तुकड्यांमधून सर्वोत्तम तीस जवानांची निवड करण्यात आली आहे. या जवानांनी गेल्या सहा महिन्यांपासून मुंबई आणि मरक्काम येथील नौकानयन केंद्रांमध्ये समुद्राच्या लाटांशी झुंज देण्याचे खडतर प्रशिक्षण घेतले आहे. नौकेवर कोणत्याही इंधनाचा वापर न करता केवळ शिडांच्या मदतीने हजारो मैलांचा प्रवास करणे, हे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते. मोहिमेला हिरवा झेंडा दाखवताना लेफ्टनंट जनरल सेठ सांगितले की, भारतीय लष्कर प्रत्येक आघाडीवर लढण्यासाठी सज्ज आहे. समुद्र साहस ही मोहीम आमच्या जवानांच्या जिद्दीचे दर्शन घडवेल. समुद्र आपल्याला नम्रता शिकवतो आणि त्याच वेळी निसर्गाशी दोन हात करण्याचे बळही देतो. ही मोहीम लष्कराच्या अथक योद्धा या प्रतिमेला अधिक उजाळा देईल. भारतीय लष्कराने यापूर्वी एव्हरेस्ट सर करणे, वाळवंटातील मोहिमा आणि ध्रुवीय प्रदेशातील संशोधनात यश मिळवले आहे. मात्र, अधिकृतरीत्या ब्लू वॉटर नौकानयन मोहिमेत उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे भविष्यात लष्कराच्या विशेष सैन्य तुकडीने सागरी मोहिमांमध्ये अधिक प्रभावीपणे वापरता येईल. तसेच, ही मोहीम राष्ट्रीय एकात्मता आणि सागरी सुरक्षेबद्दल जनजागृती करण्यासाठीही महत्त्वाची ठरेल.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
19,906 वेळा पाहिलं