दीड हजार पर्यटकांची सुखरूप सुटका

सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस आणि त्यानंतर झालेल्या भीषण भूस्खलनामुळे लाचेन आणि लाचुंग या भागातील रस्ते पूर्णपणे बंद झाले होते. त्यामुळे या ठिकाणी दीड हाजारांहून अधिक पर्यटक अडकले होते. मात्र, भारतीय सैन्याच्या त्रिशक्ती कोअरच्या जवानांनी रात्रंदिवस मेहनत करून मार्ग मोकळा केला आहे. अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची मोहीम आता युद्धपातळीवर सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून उत्तर सिक्कीममध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी रस्ते खचले होते आणि डोंगराचा भाग रस्त्यावर आला होता. यामुळे लाचेन परिसरात सुमारे पाचशेहून अधिक पर्यटक अडकले होते. रस्ते बंद असल्याने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही खंडित झाला होता. अशा कठीण परिस्थितीत भारतीय सैन्याने पुढाकार घेत ऑपरेशन रेस्क्यू सुरू केले. सैन्याच्या इंजिनिअर्सनी आधुनिक यंत्रसामग्री वापरून ढिगारे उपसले आणि तात्पुरता रस्ता तयार केला. अडकलेल्या पर्यटकांमध्ये वृद्ध, महिला आणि लहान मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. रस्ता मोकळा होईपर्यंत सैन्याने या पर्यटकांच्या राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केली होती. अतिउंचीवरील कमी ऑक्सिजन आणि थंडीमुळे अनेक पर्यटकांना श्वसनाचे त्रास जाणवत होते. सैन्याच्या डॉक्टरांनी या पर्यटकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक औषधोपचार पुरवले. रस्ता सुरू होताच सैन्याने आपल्या वाहनांतून पर्यटकांना गंगटोकच्या दिशेने हलवण्यास सुरुवात केली आहे. पर्यटकांना त्यांच्या सामानासह सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्यासाठी जवानांनी चिखलात आणि पावसातही मोलाची कामगिरी बजावली.

सिक्कीमची भौगोलिक स्थिती अत्यंत आव्हानात्मक आहे. एका बाजूला कोसळणाऱ्या दरडी आणि दुसऱ्या बाजूला वेगाने वाहणाऱ्या नद्या, अशा परिस्थितीत रस्ते दुरुस्त करणे जीवावर बेतणारे काम असते. तरीही, भारतीय सैन्याने स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाने अवघ्या काही तासांत लाचेनकडे जाणारा मुख्य मार्ग कार्यान्वित केला. पर्यटकांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे, असे लष्करी अधिकाऱ्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर सुटका झाल्यामुळे पर्यटकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळाले. एका पर्यटकाने सांगितले की, आम्ही सर्व आशा सोडून दिली होती, पण सैन्याच्या जवानांनी आम्हाला केवळ धीरच दिला नाही, तर घरच्यासारखी आमची काळजी घेतली. त्यांच्यामुळेच आज आम्ही सुरक्षित बाहेर पडू शकलो आहोत. सिक्कीम प्रशासनाने सध्या उत्तर सिक्कीममधील पर्यटनावर तात्पुरती बंदी घातली असून, हवामान सुधारल्याशिवाय पर्यटकांनी या भागात जाऊ नये, असे आवाहन केले आहे. हवामान विभागाने पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचा इशारा कायम ठेवल्याने प्रशासन सतर्क आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
2,389 वेळा पाहिलं