
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात विरार येथे ‘जीवदानी’ टेकडीवर ‘जीवदानी’ देवीचे प्रसिद्ध प्राचीन मंदिर आहे. इसवी सन १७ व्या शतकात या टेकडीवर ‘जीवधन’ नावाचा किल्ला होता. या तटबंदीच्या आत काही प्राचीन दिसणाऱ्या गुहा आणि पाण्याच्या टाक्या आहेत. हे मंदिर ‘वैतरणा’ नदीच्या काठावर आणि सातपुडा डोंगराळ भागात आहे. एकेकाळी या शहराचे नाव ‘एक-वीर’ होते. या कारणास्तव या मंदिराला ‘एकवीरा देवी’ म्हणूनही ओळखले जात होते; परंतु मुघल आणि पोर्तुगीजांच्या हल्ल्यामुळे मंदिर जीर्ण अवस्थेत पोहोचले. ‘जीवदानी’ म्हणजे जीव देणारी आई ! तज्ज्ञांच्या मते, सातपुडा डोंगराच्या या साखळीत पूर्वी जीवनदायी औषधे सापडली होती. या औषधांमुळे लोकांचे प्राण वाचले. त्यामुळे या मातेचे नाव ‘जीवदानी’ ठेवले गेले, अशीही एक धारणा आहे. तेव्हापासून लोक तिला ‘जीवनाची माता’ म्हणू लागले.
जीवदानी माता हे महाराष्ट्रातील 18 शक्तीपीठांपैकी एक आहे. या किल्ल्याच्या एका भागात जीवदानी मातेच्या मंदिराची स्थापना करण्यात आली. मंदिरात जाण्यासाठी भाविकांना सुमारे 1300 पायऱ्या चढाव्या लागतात. पायऱ्या चढू न शकणाऱ्या भाविकांसाठी मंदिरापर्यंत जाण्यासाठी ‘रोपवे’ बसवण्यात आला आहे. जीवदानी माता मंदिर परिसरात अनेक देवतांची मंदिरे स्थापन झाली आहेत. ‘नवरात्र आणि दसरा’ हे येथील मुख्य उत्सव आहेत. भक्त नवसाच्या दिवशी दिवा किंवा मेणबत्ती लावून पूजा करतात. देवीला मिठाई, बांगड्या, सिंदूर, नारळ अर्पण करतात. मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक अनवाणी पायऱ्या चढतात. रविवार हा जीवदानी मातेचा विशेष दिवस मानला जातो.
जीवदानी देवीची एक पौराणिक कथा सांगितली जाते. पांडव त्यांच्या जंगल प्रवासादरम्यान ‘शूरपारका’ येथे आले. त्यांनी भगवान परशुरामांनी पवित्र केलेल्या विमलेश्वरच्या पवित्र मंदिराला भेट दिली. त्यांनी विरार तीर्थाच्या काठी भगवती एकवीराची पूजा केली. तेथील शांतता आणि उदात्त निसर्ग पाहून जवळच्या डोंगरात त्यांनी लेणी कोरण्याचे ठरवले. एका गुहेत एकवीरा देवीच्या योग लिंगाची स्थापना करून त्यांनी पूजा केली. यानंतर तिला ‘भगवती जीवनधानी’ असे म्हटले. पुढे पांडवांनी संन्याशांसाठी शिरगावपासून सुमारे एक मैल अंतरावर असलेल्या छोट्या गुहांचा संच निर्माण केला. तो आता ‘पांडव डोंगरी’ म्हणून ओळखला जातो. अनेक योगी ‘पांडव डोंगरी’ येथे राहून ‘जीवनधानी’ देवीचे दर्शन घेत असत.