
गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरातील हवेची गुणवत्ता सातत्याने खालावत चालली आहे. शहरातील विविध भागांतील हवा गुणवत्ता निर्देशांक धोकादायक पातळीवर पोहोचला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील तब्बल पंचेचाळीस भागात, हवा गुणवत्ता मापन केंद्रांवर प्रदूषणाने दीडशेचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुंबईच्या सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक एकशे एक्कावन्नवर पोहोचला. हवामान तज्ज्ञांच्या मते, दीडशे ते दोनशे दरम्यानचा निर्देशांक हा अत्यंत वाईट आणि आरोग्यासाठी घातक श्रेणीत मोडतो. हवेत तरंगणाऱ्या सूक्ष्म कणांचे प्रमाण वाढल्याने मुंबईकरांना श्वास घेण्यास त्रास होणे, डोळ्यांची जळजळ आणि घशाचे विकार अशा समस्या जाणवू लागल्या आहेत.
शहरातील काही भागांत प्रदूषणाची तीव्रता अधिक दिसून आली. सर्वाधिक प्रदूषित भागांमध्ये विक्रोळी एकशे बाहत्तर, वडाळ्यात एकशे चौसष्ट, पवईत एकशे एकसष्ट, कुर्ल्यामध्ये एकशे सत्तावन्न, चेंबूरमध्ये एकशे छप्पन, भांडुप – चांदिवलीमध्ये एकशे पंच्चावन्न, चारकोपमध्ये एकशे चोपन्न, अंधेरीत एकशे त्रेपन्न हवेचा निर्देशांक नोंदवला आहे. या आकड्यांवरून असे स्पष्ट होते की, केवळ औद्योगिक भागच नव्हे तर निवासी भागांतील हवेचा दर्जाही कमालीचा खालावला आहे. मुंबईच्या हवेत झालेल्या या बदलाला तापमानातील चढ-उतारही कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. सध्या मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये किमान तापमान वीस अंश सेल्सिअसच्या खाली आहे. सांताक्रुझ वेधशाळेत किमान एकोणवीस अंश आणि कमाल तीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जेव्हा तापमान कमी असते, तेव्हा जमिनीलगतची हवा जड होते आणि प्रदूषके वातावरणात वर न जाता जमिनीलगतच साचून राहतात. यामुळे धुके आणि धूर यांचे मिश्रण होऊन शहरावर प्रदूषणाची चादर पसरल्याचे पाहायला मिळते.
हवा गुणवत्ता निर्देशांक दीडशे पार गेल्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे विकार असलेल्या व्यक्तींना मोठा धोका निर्माण झाला आहे. डॉक्टरांनी अशा वातावरणात सकाळी लवकर फिरणे टाळण्याचा आणि बाहेर जाताना मास्क वापरण्याचा सल्ला दिला आहे. प्रदूषणामुळे दमा, ब्राँकायटिस आणि हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांच्या अडचणी वाढू शकतात. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तापमान वीस अंशांच्या वर गेल्यास हवेच्या दाबात बदल होऊन प्रदूषणाची पातळी थोडी कमी होऊ शकते. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता महापालिकेने धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. मुंबईत सुरू असलेली बांधकामे, रस्ते खोदकामे आणि वाहनांची वाढती संख्या ही प्रदूषणाची प्रमुख कारणे आहेत. प्रशासनाने तातडीने पावले उचलली नाहीत, तर मुंबईकरांना आणखी काही दिवस या विषारी हवेत श्वास घ्यावा लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे.