महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता स्वसंरक्षण – सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राष्ट्र प्रथम अभियानांतर्गत एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. या अभियानांतर्गत राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण आणि जीवन कौशल्य मिशन राबविण्यात येत आहे. याअंतर्गत राज्यातील शाळांमध्ये आता आनंददायी शनिवारच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण, योग आणि सैनिकी प्रशिक्षण दिले जाणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही माहिती दिली.

केवळ पुस्तकी ज्ञान देऊन पिढी घडणार नाही. येणारी पिढी सुदृढ, सक्षम आणि संस्कारक्षम असावी यासाठी पाच प्रमुख स्तंभांवर हे अभियान आधारलेले असेल. राणी लक्ष्मीबाई आत्मसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमा अंतर्गत ग्रँड मास्टर शिफूजी भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील दहा हजार प्रशिक्षक, विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे देतील. वाढत्या असुरक्षिततेच्या काळात मुलींना आत्मनिर्भर बनवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेम रुजवण्यासाठी माजी सैनिक आणि एनसीसी कॅडेट्सची मदत घेतली जाईल. यामध्ये संचलन, कवायत आणि सैनिकी शिस्तीचे धडे दिले जातील.

वारकरी शिक्षण संस्था आणि विविध क्षेत्रांतील दहा हजार प्रबोधनकार विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. यामध्ये अहिंसा, क्षमा, करुणा, कर्तव्य भावना आणि संस्कारांचे महत्त्व सांगितले जाईल. आळंदीच्या सदगुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचाही यात सहभाग असेल. तसेट आर्ट ऑफ लिव्हिंग आणि त्र्यंबकेश्वर येथील योग संस्थांच्या मदतीने दहा हजार योग प्रशिक्षक विद्यार्थ्यांची एकाग्रता आणि मनोबल वाढवण्यासाठी कार्य करतील. विद्यार्थ्यांना संतुलित आहार, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्याचे महत्त्व सांगितले जाईल. विशेषतः मोबाईल आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम समजावून सांगण्यासाठी राज्यभर आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील. हे सर्व उपक्रम शालेय वेळापत्रकातील आनंददायी शनिवार या उपक्रमांतर्गत विविध तासिकांमध्ये राबवले जातील. यामुळे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होऊन त्यांना नवीन कौशल्ये शिकण्याची संधी मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याच्या नेतृत्वाखालील राष्ट्र प्रथम ही संकल्पना तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मिशन महत्त्वाचे ठरणार आहे.






19,266 वेळा पाहिलं