एक एप्रिलपासून फास्टॅग वार्षिक पासच्या दरात वाढ – वाहनधारकांना फटका

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने आगामी आर्थिक वर्षासाठी फास्टॅग वार्षिक पासच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्णयानुसार, एक एप्रिल २०२६ पासून फास्टॅगचा वार्षिक पास घेण्यासाठी प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. केंद्र सरकारच्या महागाई निर्देशांकाशी निगडित असलेल्या या दरवाढीमुळे देशभरातील लाखो खासगी वाहनधारकांच्या खिशावर बोजा पडणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास वेगवान आणि सुलभ करण्यासाठी १५ ऑगस्ट २०२५ रोजी फास्टॅग वार्षिक पास ही विशेष सुविधा सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला या पासची किंमत तीन हजार रुपये इतकी निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता एनएचएआयने यामध्ये दोन पूर्णांक पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. आता या पासची किंमत नवीन दराने तीन हजार पंच्याहत्तर इतकी निश्चित करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून हा नवीन दर लागू करण्यात येईल. हा वार्षिक पास प्रामुख्याने नॉन-कमर्शियल म्हणजेच वैयक्तिक वापराच्या वाहनांसाठी कार, जीप, व्हॅन उपलब्ध आहे. या पासची वैधता दोन निकषांवर आधारित असते. हा पास खरेदी केल्यापासून एक वर्षासाठी वैध असेल. एका वर्षात जास्तीत जास्त दोनशे वेळा टोल नाका ओलांडण्याची सुविधा यामध्ये मिळते. जर वाहनधारकाने एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच दोनशे फेऱ्या पूर्ण केल्या, तर या पासची मुदत संपेल. अशा वेळी प्रवाशाला पुन्हा तीन हजार पंच्याहत्तर रुपये भरून नवीन पास घ्यावा लागेल किंवा नियमित फास्टॅग बॅलन्स वापरावा लागेल.

हा वार्षिक पास देशातील सुमारे एक हजार एकशे पन्नास राष्ट्रीय महामार्ग आणि एक्स्प्रेस-वे वापरता येईल. मात्र, ही सुविधा केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येणाऱ्या टोल नाक्यांवरच लागू असेल. राज्य महामार्ग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या टोल नाक्यांवर हा पास चालणार नाही; तिथे नियमित फास्टॅग दराने पैसे कापले जातील. एनएचएआयच्या नियमांनुसार, या पासच्या दरांचे दरवर्षी पुनरावलोकन केले जाणार आहे. महागाई आणि देखभालीचा खर्च लक्षात घेऊन दरवर्षी एप्रिल महिन्यात यामध्ये किरकोळ बदल केले जाण्याची शक्यता आहे. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आता तीन हजार पंच्याहत्तर रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. फास्टॅग वार्षिक पास सुविधेला वाहनधारकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या देशात पन्नास लाखांहून अधिक सक्रिय पासधारक आहेत. दररोजच्या टोल शुल्कापेक्षा हा वार्षिक पास स्वस्त पडत असल्याने नियमित प्रवास करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरली आहे. एकट्या जानेवारी २०२६ पर्यंत या पासच्या माध्यमातून सहवीस पूर्णांक पंच्यावन्न कोटींहून अधिक व्यवहार झाले आहेत. ज्या वाहनधारकांकडे आधीच सक्रिय फास्टॅग आहे, ते राजमार्ग यात्रा मोबाइल ॲप किंवा एनएचएआयच्या अधिकृत वेबसाइटवरून हा वार्षिक पास खरेदी करू शकतात. पेमेंट केल्यानंतर साधारण दोन तासांत हा पास संबंधित वाहनाच्या फास्टॅग आयडीवर सक्रिय होतो.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
8,550 वेळा पाहिलं