विरार – चर्चगेट पंधरा डब्यांची लोकल सुरू
वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने बारा डब्यांच्या सोळा लोकल फेऱ्यांचे रूपांतर पंधरा डब्यांच्या लोकलमध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विरार, नालासोपारा, वसई आणि भाईंदर ही पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीची स्थानके आहेत. या भागातून दररोज लाखो प्रवासी कामासाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. गेल्या अनेक दिवसांपासून प्रवाशांकडून लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची किंवा डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी सातत्याने केली जात होती. याच मागणीची दखल घेत रेल्वे प्रशासनाने चर्चगेट ते विरार दरम्यान या नवीन गाड्या सेवेत दाखल केल्या आहेत.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या बारा डब्यांच्या सोळा सेवा आता पंधरा डब्यांच्या स्वरूपात धावतील. यामुळे पश्चिम रेल्वेवरील पंधरा डब्यांच्या एकूण सेवांची संख्या दोनशे अकरावरून दोनेश सत्तावीसवर पोहोचली आहे. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे या सोळा फेऱ्यांपैकी आठ फेऱ्या सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत चालवल्या जाणार आहेत. यामुळे एकाच वेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या क्षमतेत सुमारे पंचवीस टक्के वाढ झाली आहे.
या नवीन पंधरा डब्यांच्या लोकलची निर्मिती चेन्नई येथे करण्यात आली आहे. यापूर्वी बारा डब्यांच्या गाडीला तीन जादा डबे जोडले जात असत. मात्र, आता थेट पंधरा डब्यांचे नवीन रेक मिळाल्यामुळे तांत्रिक क्षमता आणि वेग सुधारण्यास मदत होणार आहे. विरार कारशेडमध्ये या गाड्यांच्या यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्यानंतरच त्या प्रवाशांच्या सेवेत आणल्या गेल्या आहेत.