हजारो मुंबईकर पीएनजीच्या प्रतीक्षेत
राज्य सरकारने पाईप गॅस वापरण्याबाबत दिलेली तीन महिन्यांची मुदत, यामुळे मुंबईत पीएनजी जोडणीसाठी अर्जांचा ओघ प्रचंड वाढला आहे. परिणामी, मुंबईकरांना आता नवीन गॅस जोडणीसाठी तीन महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंत वाट पाहावी लागत आहे.
मार्च महिन्यात नवीन पीएनजी जोडणीसाठी येणाऱ्या अर्जांमध्ये तब्बल दोनशे टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. फेब्रुवारीमध्ये अर्जांची संख्या सुमारे सोळा हजार होती, ती मार्चमध्ये पन्नास हजारांच्या वर पोहोचली आहे. गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे सुरक्षित पर्याय म्हणून नागरिक पीएनजीकडे वळत आहेत. काही उपनगरांमध्ये जोडीणीसाठी तीन महिने, तर दाट वस्तीच्या भागात एक वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. महानगरा गॅसच्या कार्यालयात दररोज होणाऱ्या चौकशीचे प्रमाणही चार ते पाच टक्क्यांनी वाढले आहे. अनेक सोसायट्यांमध्ये पाईपलाईनचे जाळे आधीच टाकलेले आहे, तरीही प्रत्यक्ष स्वयंपाकघरात गॅस पोहोचण्यास विलंब होत आहे. अरुंद गल्ल्या आणि दाट वस्तीमुळे शेवटच्या टप्प्यातील खोदकाम करणे कठीण जात आहे. रस्ते खोदकामासाठी महापालिकेची परवानगी मिळण्यात येणाऱ्या अडचणी आणि आधीच असलेल्या भूमिगत केबल्सचे जाळे, काही ठिकाणी नाले आडवे येत असल्याने पाईपलाईन टाकण्याचे काम रखडले आहे. अनधिकृत बांधकामांमुळे यंत्रणेला कामासाठी पुरेशी जागा मिळत नाहीये.
युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे सरकारने ज्या ठिकाणी पीएनजीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे सिलिंडर परत करून पीएनजी घेण्याचे आदेश दिले आहेत. नागरिकांना हे बदल करण्यासाठी नव्वद दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पीएनजी वापरणाऱ्या ग्राहकांना युद्धाचा किंवा पुरवठा साखळीचा फटका बसलेला नाही, कारण निम्म्याहून अधिक नैसर्गिक वायू देशांतर्गत उत्पादित होतो.वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी महानगर गॅस लिमिटेडने विशेष पथके तैनात केली आहेत. ही पथके स्थानिक रहिवासी आणि महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून अडथळे दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या तीन महिन्यांत जास्तीत जास्त घरांमध्ये कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जर तुमच्या इमारतीत आधीच पाईपलाईन आली असेल, तर अंतर्गत फिटिंगसाठी तातडीने नोंदणी करा. सध्या सिलिंडरसाठी आठ ते दहा दिवसांचे वेटिंग असल्याने पीएनजी हाच दीर्घकालीन आणि स्वस्त पर्याय ठरणार आहे.