किनारी प्रकल्पामुळे मच्छीमारांना दिलासा
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असलेल्या आक्षी-साखर परिसरातील मच्छीमारांसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणारा महत्त्वाचा किनारी प्रकल्प एक मोठा दिलासा ठरणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये लाटरोधक बंधारा, धक्का (जेट्टी), पोहोच रस्ता तसेच खाडीतील गाळ काढण्याच्या कामांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणात साचणाऱ्या गाळाची समस्या या प्रकल्पामुळे कायमस्वरूपी सुटणार असून, यामुळे मासेमारी करणाऱ्या नौकांना अत्यंत सुरक्षित आणि सुलभपणे ये-जा करणे शक्य होणार आहे.
कोकण किनारपट्टीच्या विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ ८ एप्रिल २०२६ रोजी आक्षी साखर येथे करण्यात आला. सुमारे एकशे एकोणचाळीस पूर्णांक ब्याण्णव कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. बंधारे उभारणे, गाळ काढणी करणे तसेच मच्छिमारांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करणे या कामांचा यात समावेश असून, या प्रकल्पांमुळे किनारपट्टीच्या विकासाचा नवा टप्पा सुरू झाला आहे.
सदर प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून काम यशदा प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. ही सर्व कामे चोवीस महिन्यांत पूर्ण करण्याचा शब्द मंत्री राणे यांनी यावेळी दिला. काम दर्जेदार, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होईल, याची हमीही त्यांनी उपस्थितांना दिली.
सध्या आक्षी-साखर खाडीच्या मुखाशी मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्यामुळे खाडीचे पात्र अत्यंत अरुंद झाले असून मच्छीमारांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. मासेमारी करून परतणाऱ्या नौकांना थेट बंदरात पोहोचणे कठीण होत असून, अनेकदा खोल समुद्रातून परतल्यावर भरतीची प्रतीक्षा करावी लागते. यामुळे मच्छीमारांचा अमूल्य वेळ वाया जातो, इंधनाचा खर्च वाढतो आणि मुख्य म्हणजे उशिरा पोहोचल्यामुळे मासळीची गुणवत्ता घटते. काही वेळा कमी पाणी असल्यामुळे नौका गाळात रुतून बसण्याचा किंवा अपघात होण्याचा धोकाही निर्माण होत आहे.
या गंभीर समस्येवर उपाययोजना म्हणून प्रकल्पाच्या आराखड्यानुसार सुमारे दोन हजार दोनशे पंचेचाळीस मीटर लांबीचा एक भक्कम लाटरोधक बंधारा उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर खाडीतील साचलेला गाळ उपसून पात्र मोकळे केले जाईल आणि ऐंशी मीटर लांब व दहा मीटर रुंद अशा दोन प्रशस्त धक्क्यांची उभारणी करण्यात येणार आहे. या धक्क्यांना मुख्य भूभागाशी जोडण्यासाठी चारशे मीटर लांबीचा आणि सात मीटर रुंदीचा एक सुसज्ज रस्ता देखील तयार केला जाणार आहे, जेणेकरून मासळीची चढ-उतार आणि वाहतूक करणे अधिक सोपे होईल. यामुळे भविष्यात कोणत्याही भरती-ओहोटीच्या परिस्थितीत नौकांना सुरक्षितपणे ये-जा करता येईल, इंधनाची मोठी बचत होईल आणि मासळी ताजी राहिल्याने मच्छीमारांना बाजारात अधिक चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.
सुधारित पायाभूत सुविधा आणि सुरक्षित धक्क्यांमुळे या भागात पर्यटकांचा ओघ वाढण्याची दाट शक्यता आहे. पर्यटन वाढल्यामुळे स्थानिक उपहारगृहे, वाहतूक आणि इतर छोट्या व्यावसायिकांना बळ मिळेल, ज्यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होतील. अशाप्रकारे हा प्रकल्प अलिबागच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.