चीनी कॅमेऱ्यांतून पाकिस्तानी घुसखोरीचा धोका

भारताच्या सीमा सुरक्षा दलासमोर आता केवळ प्रत्यक्ष घुसखोरांचेच नाही, तर डिजिटल घुसखोरीचेही मोठे आव्हान उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांत भारत-पाकिस्तान सीमेवर चिनी बनावटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून हेरगिरी केली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. तंत्रज्ञानाचा हा गैरवापर भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत संवेदनशील विषय बनला असून, सुरक्षा यंत्रणांनी यावर कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानकडून भारतीय सीमेवर सातत्याने कुरघोडी करण्याचे प्रयत्न केले जातात. मात्र, आता त्यांनी आपला मोर्चा तंत्रज्ञानाकडे वळवला आहे. सीमेपलीकडे असलेल्या पाकिस्तानी चौक्यांवर मोठ्या प्रमाणात चिनी बनावटीचे प्रगत तंत्रज्ञान असलेले कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे कॅमेरे केवळ सामान्य देखरेखीसाठी नसून, त्यामध्ये अत्यंत प्रगत रात्रीची दृष्टी आणि औष्णिक चित्रण सुविधा आहेत. यामुळे रात्रीच्या अंधारातही भारतीय जवानांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे पाकिस्तानला शक्य होत आहे. या प्रकरणातील सर्वात चिंतेची बाब म्हणजे या कॅमेऱ्यांची सर्व माहिती चीनमधील सर्व्हरवर साठवला जाण्याची शक्यता आहे. चीन आणि पाकिस्तान यांच्यातील जवळचे संबंध पाहता, ही माहिती थेट पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयला पुरवला जाऊ शकतो. भारतीय सैन्य कोणत्या वेळी गस्त घालते, सीमेवरील कोणत्या भागात सुरक्षा व्यवस्था कमी आहे, यासारखी महत्त्वाची माहिती या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गोळा केली जात आहे. हे एक प्रकारचे डिजिटल युद्ध असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

फक्त स्थिर कॅमेरेच नाही, तर चिनी बनावटीच्या ड्रोन्सचा वापर करूनही पाकिस्तान भारतीय हद्दीत हेरगिरी करत आहे. हे ड्रोन्स कॅमेऱ्यांनी सज्ज असून ते अंमली पदार्थ आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यासाठी देखील वापरले जातात. आता या ड्रोन्सचा वापर करून भारतीय लष्कराच्या छावण्यांची आणि महत्त्वाच्या ठिकाणांची छायाचित्रे काढली जात आहेत. यामुळे सीमेवरील पारंपारिक सुरक्षा व्यवस्थेला मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या वाढत्या धोक्याची दखल घेत भारतीय सीमा सुरक्षा दलाने आपली रणनीती बदलली आहे. सीमेवर आता ड्रोन विरोधी यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तसेच, पाकिस्तानच्या या कॅमेऱ्यांना चकवा देण्यासाठी भारतानेही आपले स्वदेशी बनावटीचे प्रगत तंत्रज्ञानाची पाळत ठेवणारे तंत्रज्ञान विकसित करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी चिनी कॅमेरे बसवलेले आढळले आहेत, त्या भागातील भारतीय जवानांच्या हालचाली अधिक गुप्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारनेही या विषयाची गंभीर दखल घेतली असून, संवेदनशील भागांत चिनी उपकरणांच्या वापरावर मर्यादा आणण्याचे धोरण आखले आहे. भारतीय संरक्षण दलामध्ये वापरली जाणारी सर्व डिजिटल उपकरणे ही मेक इन इंडिया अंतर्गत असावीत आणि त्यांचा डेटा पूर्णपणे सुरक्षित राहावा, याकडे लक्ष दिले जात आहे. सायबर तज्ज्ञांच्या मते, सीमेवर केवळ भिंती बांधून चालणार नाही, तर एक डिजिटल भिंत उभी करण्याची गरज आहे जी शत्रूच्या कोणत्याही तांत्रिक हल्ल्याला परतावून लावेल.






365 वेळा पाहिलं