आकुर्डी चौकात वाहतुकीचा खोळंबा
पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी येथील संत ज्ञानेश्वर महाराज चौकात पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सिग्नल यंत्रणेत वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे या भागातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून, वाहनचालकांना तासनतास संतापजनक कोंडीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः सकाळ आणि संध्याकाळच्या ‘पिक अवर्स’मध्ये या चौकातील स्थिती गंभीर होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज चौक हा निगडी, प्राधिकरण आणि देहूरोड या भागांना जोडणारा मुख्य दुवा आहे. गेल्या काही दिवसांपासून या चौकातील सिग्नल यंत्रणा वारंवार बंद पडत आहे. कधी तांत्रिक बिघाड, तर कधी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे सिग्नल काम करणे थांबवतात. अशा वेळी चारही दिशांनी येणारी वाहने एकाच वेळी चौकात शिरल्यामुळे पेच निर्माण होतो. या चौकातून अवजड वाहने, पीएमपीएल बसेस आणि खासगी कंपन्यांच्या बसची ये-जा असते. सिग्नल बंद असल्यामुळे प्रत्येक वाहनचालक पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो, ज्यामुळे वाहतुक कोंडी निर्माण होते. यामध्ये सकाळी कामावर जाणारे चाकरमानी आणि संध्याकाळी घरी परतणारे नागरिक या कोंडीत अडकून पडत आहेत. दहा मिनिटांच्या अंतरासाठी प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास लागत आहे. संथ वाहतुकीमुळे वाहनांचे इंधन वाया जात असून प्रदूषणातही भर पडत आहे. या मार्गावर अनेक रुग्णालये असल्याने रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा फटका बसत असून, रुग्णांचे प्राण धोक्यात येत आहेत.
स्थानिक नागरिकांनी आणि वाहनचालकांनी अनेकदा तक्रार करूनही वाहतूक पोलीस आणि महानगरपालिका प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. चौकात पुरेशा प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात नसल्याने बेशिस्त वाहनचालकांवर कोणाचेही नियंत्रण राहत नाही. जेव्हा सिग्नल बंद असतो, तेव्हा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवली जातात, ज्यामुळे अपघातांची शक्यताही वाढली आहे. यामुळे या परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर काही उपाययोजना सुचवल्या आहेत. सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाड कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. जोपर्यंत सिग्नल सुरळीत होत नाही, तोपर्यंत या चौकात किमान चार ते पाच वाहतूक पोलीस तैनात राहणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत येत असल्याने येथे सेन्सर आधारित वाहतूक यंत्रणा राबवण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडले आहे.