अवकाळी पावसाने मासळी व्यवसाय ठप्प
उरण परिसरामध्ये अचानक झालेल्या बेमोसमी पावसामुळे सुक्या मासळीच्या व्यवसायाला फटका बसला आहे. समुद्रकिनाऱ्यावर आणि मोकळ्या जागेत वाळवण्यासाठी ठेवलेली मासळी पावसात भिजल्याने तिचे नुकसान झाले असून कोळी बांधव आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे येणाऱ्या काळात सुक्या मासळीच्या पुरवठ्यावर परिणाम होऊन किमती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
साधारणपणे पावसाळ्याच्या दिवसांत समुद्रातील मासेमारी बंद असते, अशा वेळी ताज्या मासळीची आवक कमी झाल्यामुळे नागरिक सुक्या मासळीला अधिक पसंती देतात. यंदा पावसाळा तोंडावर आलेला असतानाच आणि बाजारात मागणी वाढत असतानाच हा पाऊस पडला आहे. यामुळे साठवून ठेवलेल्या सुक्या मासळीच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असून, ग्राहकांना आता वाढीव दराने खरेदी करावी लागणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून समुद्रातून मिळणाऱ्या मासळीचे प्रमाण कमी झाल्याने सुक्या मासळीचे दर आधीच चढे होते. त्यातच या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. विशेषतः बोंबील, जवळा, आंबार आणि कोलंबी यांसारख्या लोकप्रिय सुक्या प्रकारांना बाजारात मागणी असते, मात्र आता या पदार्थांची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उरण तालुक्यातील करंजा, खोपटे, केळवणे आणि दिघाटी यांसारख्या कोळीवाड्यांमध्ये मासळी वाळवण्याचा व्यवसाय चालतो. येथील रस्त्यांच्या कडेला आणि विस्तीर्ण मैदानांवर मासे सुकवले जातात. सध्या अनेक छोटे विक्रेते टोपल्यांमधून सुकी मासळी विक्रीसाठी आणत असून, बाजारात विविध प्रकारची मासळी उपलब्ध असली तरी पावसाच्या सावटामुळे विक्रीवर काहीसा परिणाम झालेला दिसून येतो.
सध्याच्या बाजारभावानुसार कोलमाची वडी सुमारे पन्नास रुपये, जवळा सुमारे दोनशे रुपये, तर आंबार आणि दांडी सुकट सुमारे चारशे रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे. याव्यतिरिक्त बोंबील चारशे ते सातशे रुपये, वाकट्या दोनशे ते पाचशे रुपये, माखली सुमारे एक हजार रुपये, पापलेट सहाशे रुपये आणि कोलंबी सोडे सुमारे एक हजार आठशे रुपये प्रति किलो या दराने उपलब्ध आहेत. या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे.