भारत – न्यूझीलंडमध्ये मुक्त व्यापार संवाद

भारत–न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर आग्रा येथे २६ एप्रिल २०२६ रोजी एक महत्त्वपूर्ण उद्योग संवाद कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियूष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार व गुंतवणूक मंत्री टॉड मॅक्ले यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. यावेळी मत्स्यपालन, पशुपालन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री एस. पी. बघेल यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत चामडे व पादत्राणे, आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, वैद्यकीय उपकरणे, हलके अभियांत्रिकी, क्रीडासाहित्य तसेच लघुउद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी आपले विचार मांडले.

या ऐतिहासिक कराराबाबत दोन्ही मंत्र्यांनी स्पष्ट केले की, हा करार केवळ करसवलतीपुरता मर्यादित नाही. हा बाजारपेठ प्रवेश, शेती उत्पादकता, गुंतवणूक, कौशल्य व मनुष्यबळ गतिशीलता, पर्यटन, क्रीडा आणि दोन्ही देशांतील नागरिकांमधील संबंध दृढ करणारा एक व्यापक आराखडा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक आणि भविष्याभिमुख व्यापार धोरणाच्या दृष्टीने हा करार एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचे या वेळी नमूद करण्यात आले. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंधांना या माध्यमातून नवीन उंचीवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

आग्रा शहर हे भारतातील सुमारे पंचाहत्तर टक्के चामड्याची पादत्राणे उत्पादनासाठी प्रसिद्ध असून या उत्पादनाला भौगोलिक निर्देशांक मानांकनही मिळाले आहे. या करारानंतर भारतीय निर्यातीवरील शंभर टक्के शुल्क रद्द होणार असून, विशेषतः चामडे व पादत्राणांवरील पाच टक्के कर शून्यावर येणार आहे. यामुळे भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारपेठेत मोठा स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे. उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी या क्षेत्राचा विकास २०३० पर्यंत पन्नास अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याची क्षमता असल्याचे या वेळी सांगितले.

या संवादादरम्यान औषधनिर्मिती आणि वैद्यकीय उपकरण क्षेत्रावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. उद्योग प्रतिनिधींनी या करारातील नियमांच्या सुलभतेचे स्वागत केले आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तपासणी अहवालांना मान्यता मिळाल्यामुळे उत्पादन मंजुरीची प्रक्रिया आता अधिक जलद होईल, असा विश्वास व्यक्त केला. आरोग्य आणि पारंपरिक वैद्यकशास्त्रासाठी या करारात स्वतंत्र तरतूद करण्यात आली असून, यामुळे भारताच्या आयुष क्षेत्रालाही जागतिक स्तरावर मोठी चालना मिळणार आहे. मंत्री पियूष गोयल यांनी या वेळी सांगितले की, शिक्षण, कौशल्य आणि रोजगाच्या संधींबाबत या करारामुळे मोठी दालने खुली होतील. त्यांनी उद्योजकांना या संधींचा व्यापक लाभ घेण्याचे आवाहन केले. टॉड मॅक्ले यांनी भारताला न्यूझीलंडचा धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भागीदार असल्याचे सांगत या कराराचा गौरव केला. १६ मार्च २०२५ रोजी सुरू झालेली ही चर्चा केवळ नऊ महिन्यांत यशस्वीपणे पूर्ण झाली असून, यामुळे उभय देशांतील द्विपक्षीय आर्थिक संबंधांमध्ये एका नव्या पर्वाचा प्रारंभ होणार आहे.






3,177 वेळा पाहिलं