भारताला रशियाकडून एस – चारशे प्रणालीचे संच

भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात भर पडणार आहे. रशियाकडून एस चारशे ट्रायम्फ या जगातील सर्वात प्रगत हवाई संरक्षण प्रणालीचे उर्वरित दोन संच भारताला लवकरच प्राप्त होणार आहेत. या आठवड्यापासून या प्रक्रियेला वेग आला असून, मे महिन्याच्या मध्यापर्यंत चौथी रेजिमेंट भारतात दाखल होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भारताच्या सीमावर्ती भागातील हवाई सुरक्षा अधिक अभेद्य होणार आहे.

भारत आणि रशिया यांच्यात २०१८ मध्ये पाच पूर्णांक त्रेचाळीस अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे चाळीस हजार कोटी रुपयांमध्ये करार झाला होता. या करारानुसार रशिया भारताला एकूण पाच एस चारशे यंत्रणा पुरवणार आहे. यापूर्वी भारताला तीन यंत्रणा मिळाल्या असून त्या चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर तैनात करण्यात आल्या आहेत. रशियाने या चौथ्या यंत्रणेची रवाना करण्याची प्रक्रिया गेल्या आठवड्यात सुरू केली आहे. भारतीय हवाई दलाच्या पथकाने १८ एप्रिल रोजी रशियामध्ये याची अंतिम तपासणी पूर्ण केली होती. ही यंत्रणा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात भारतीय बंदरावर पोहोचेल. या करारातील शेवटची आणि पाचवी यंत्रणा नोव्हेंबर २०२६ पर्यंत भारताला मिळण्याची अपेक्षा आहे.

नुकत्याच झालेल्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेदरम्यान एस चारशे यंत्रणेने अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली होती. शत्रूची विमाने आणि ड्रोन अचूकपणे टिपण्याच्या या क्षमतेमुळे भारतीय संरक्षण दलाने या प्रणालीवर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. याच यशाच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने नुकतीच अतिरिक्त पाच एस चारशे यंत्रणा खरेदी करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. या नव्या ऑर्डरमुळे भारताकडे एकूण दहा एस चारशे रेजिमेंट होतील, ज्यामुळे संपूर्ण देशाचे आकाश हवाई उड्डाण प्रतिबंधित क्षेत्रामध्ये रूपांतरित करण्याची क्षमता भारताकडे येईल.

एस चारशे ही केवळ क्षेपणास्त्र यंत्रणा नसून ते एक फिरते संरक्षण कवच आहे. हे एस चारशे किलोमीटरच्या परिघात एकाच वेळी ऐंशी लक्ष्यांचा म्हणजेच विमाने, क्रूझ मिसाईल्स, ड्रोन मागोवा घेऊन त्यांना नष्ट करू शकते. याची क्षेपणास्त्रे आवाजाच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेगाने प्रवास करतात. यात चार वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेपणास्त्रांचा वापर होतो, जे चाळीस किमी पासून चारशे किमी पर्यंतच्या अंतरावर मारा करू शकतात. चौथ्या एस चारशे रेजिमेंटची तैनाती राजस्थान सेक्टरमध्ये केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे पाकिस्तानच्या बाजूने येणाऱ्या कोणत्याही हवाई धोक्याला सीमेच्या पलीकडेच रोखणे शक्य होईल. रशियाकडून मिळणाऱ्या या दोन यंत्रणांमुळे भारताची उत्तरेकडील आणि पश्चिमेकडील सीमा पूर्णपणे सुरक्षित होईल. अमेरिकेच्या निर्बंधांच्या धमकीला न जुमानता भारताने आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देत हा व्यवहार पूर्णत्वास नेला आहे. यामुळे जागतिक स्तरावर भारताची संरक्षण धोरणे अधिक स्वायत्त असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.






6,861 वेळा पाहिलं