विधानपरिषदेसाठी सहा नावांची घोषणा

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या २०२६ च्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपली उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रज्ञा सातव आणि नगरमधील तरुण नेतृत्व विवेक कोल्हे यांच्या निवडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेल्या यादीत प्रमोद जठार, संजय भेंडे, माधवी नाईक, विवेक कोल्हे, सुनील कर्जतकर, प्रज्ञा सातव यांचा समावेश आहे. प्रमोद जठार हे माजी आमदार आणि कोकणातील आक्रमक नेतृत्व आहे. संजय भेंडे हे नागपूर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत. माधवी नाईक या भाजपच्या वरिष्ठ महिला नेत्या आणि प्रवक्त्या आहेत. विवेक कोल्हे हे नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील तरुण नेतृत्व आहे. सुनील कर्जतकर हे संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते आहेत. तर काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना त्यांच्याच रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.

राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषदेतील माजी आमदार प्रज्ञा सातव यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता. महाविकास आघाडीला धक्का देण्यासाठी भाजपने त्यांना तातडीने उमेदवारी देऊन मराठवाड्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात कोल्हे कुटुंबाचे वजन आहे. विवेक कोल्हे यांना उमेदवारी देऊन भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमधील स्थानिक समीकरणे आपल्या बाजूने वळवण्याची खेळी खेळली आहे. या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे भाजपने कोणत्याही विद्यमान आमदाराला पुन्हा संधी दिलेली नाही. पक्षासाठी अनेक वर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि संघटनात्मक नेत्यांना सभागृहात पाठवण्याचा निर्णय वरिष्ठ नेतृत्वाने घेतला आहे. केशव उपाध्ये आणि माधव भांडारी यांसारख्या वरिष्ठ नेत्यांची नावे चर्चेत असतानाही, त्यांना यावेळी यादीत स्थान मिळालेले नाही. या निवडणुकीत दहा जागांसाठी चुरस असून महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर होण्याची चिन्हे आहेत. भाजपने सहा उमेदवार रिंगणात उतरवून जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीमुळे महाविकास आघाडीची मते फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.






3,839 वेळा पाहिलं