राज्याची विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार
महाराष्ट्र विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक आता बिनविरोध होणार असल्याचे निश्चित झाले आहे. आज गुरुवार दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी या निवडणुकीचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला होता, ज्यानुसार १२ मे २०२६ रोजी मतदान आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होणार होता. मात्र, दहा जागांसाठी अकरावा उमेदवार निवडणूक रिंगणात नसल्याने आता प्रत्यक्ष मतदानाची गरज उरलेली नाही.
या निवडणुकीसाठी एकूण दहा मुख्य उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, काही अपक्ष उमेदवारांनीही आपले अर्ज सादर केले होते, परंतु त्यांना नियमानुसार आवश्यक असलेल्या दहा आमदारांचे समर्थन मिळू शकले नाही. तांत्रिक छाननीत हे अर्ज बाद होण्याची शक्यता असल्याने आता केवळ दहाच अधिकृत उमेदवार रिंगणात उरले आहेत. त्यामुळे सर्व प्रमुख राजकीय पक्षांकडून उभे करण्यात आलेले सर्व उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपकडून पाच उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, ज्यामध्ये सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रमोद जठार यांच्या नावाचा समावेश आहे. तर प्रज्ञा सातव या विधान परिषदेची पोटनिवडणूक लढवणार आहेत. काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेल्या प्रज्ञा सातव या काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदार होत्या. सातव यांनी पक्ष सोडल्यानंतर त्यांना विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या जागेवरही पोटनिवडणूक जाहीर झालीय. त्यामुळे सातव यांना भाजपाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आलीय.
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी यांना संधी मिळाली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून अंबादास दानवे हे एकमेव उमेदवार मैदानात आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव देखील चर्चेत होतं. जर उद्धव ठाकरे ही निवडणूक लढवणार असतील तर आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने घेतली होती. काँग्रेसची देखील तीच भूमिका होती. मात्र ऐनवेळी शिवसेना ठाकरे गटाकडून अंबदास दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली, त्यामुळे शिवसेना शिंदे गट, भाजप आणि काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. काँग्रेसने दानवे यांना पाठिंबा दिला तर शिवसेना शिंदे गट आणि भाजपकडून देखील कोणताही अतिरिक्त उमेदवार देण्यात न आल्यानं आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.
विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्याचे दिसून येते, त्यामुळे त्यांचे आठ उमेदवार सहज निवडून येण्याची स्थिती आधीच निर्माण झाली होती. विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे एकशे एकतीस आमदार, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सत्तावन्न आमदार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस आमदार असे भक्कम संख्याबळ आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ सेहेचाळीस इतके असून त्या जोरावर त्यांचा एकच उमेदवार निवडून येणे शक्य होते.
दरम्यान, विधान परिषदेतील काही विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ संपत असून त्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांमध्ये उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट), गोपीचंद पडळकर (भाजप), रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप), राजेश राठोड (काँग्रेस), प्रवीण दटके (भाजप) आणि रमेश कराड (भाजप) यांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर नव्या सदस्यांची ही निवड बिनविरोध होत असल्याने राज्याच्या आगामी राजकीय समीकरणांवर आणि सत्तेच्या संतुलनावर त्याचा मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.