
राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना विविध सरकारी सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देणारे आपले सरकार हे महत्त्वाचे संकेतस्थळ गेल्या चार-पाच दिवसांपासून तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाले आहे. या बिघाडामुळे लाखो नागरिकांची महत्त्वाची कामे रखडली असून, प्रलंबित अर्जांचा डोंगर साचला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग मंत्री आशिष शेलार यांनी संकेतस्थळ लवकरच पूर्ववत होईल, असे आश्वासन दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २७ एप्रिलच्या रात्रीपासून आपले सरकार संकेतस्थळामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. तेव्हापासून नागरिकांना लॉगिन करण्यात आणि नवीन अर्ज सादर करण्यात अडचणी येत आहेत. विशेषतः जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, उत्पन्न प्रमाणपत्र आणि विविध शैक्षणिक शिष्यवृत्तींसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या प्रवेश प्रक्रिया आणि स्पर्धा परीक्षांचे हंगाम सुरू असल्याने या तांत्रिक बिघाडाचा फटका राज्याच्या कानाकोपऱ्यातील पालकांना आणि विद्यार्थ्यांना बसत आहे.
या गंभीर तांत्रिक समस्येची दखल घेत मंत्री आशिष शेलार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची आणि आयटी तज्ज्ञांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी संकेतस्थळाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तांत्रिक बिघाडाचे नेमके मूळ शोधण्यासाठी आणि भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी एक विशेष तज्ज्ञ समिती युद्धपातळीवर काम करत आहे. केवळ दुरुस्तीच नाही, तर संकेतस्थळ अधिक सुरक्षित आणि सक्षम करण्यावर भर दिला जात असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. सायबर सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही यंत्रणांची तपासणी केली जात आहे.
दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असून संकेतस्थळ लवकरच पूर्ण क्षमतेने सुरू होईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. राज्यातील नागरिकांसाठी सेवा वितरणाचे हे एक महत्त्वाचे डिजिटल व्यासपीठ आहे. तांत्रिक अडचणींवर मात करण्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस काम करत आहेत. नागरिकांनी थोडा संयम ठेवावा आणि आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रांशी संपर्कात राहावे, असे आवाहन मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे. आपले सरकार संकेतस्थळाद्वारे महसूल, गृह, कामगार आणि समाजकल्याण अशा विविध विभागांच्या शेकडो सेवा ऑनलाइन दिल्या जातात. दररोज लाखो नागरिक या सुविधेचा लाभ घेतात. संकेतस्थळ बंद असल्याने महा-ई-सेवा केंद्रे आणि सेतू केंद्रांबाहेर नागरिकांच्या रांगा पाहायला मिळत आहेत. प्रशासनाने हे संकेतस्थळ जलद गतीने सुरू करण्याचे निर्देश दिले असून, सेवा पूर्ववत झाल्यानंतर प्रलंबित अर्जांचा निपटारा करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे.