
हैदराबाद: पश्चिम आशियातील संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. या सोबतच त्यांनी एक वर्ष सोनं खरेदी न करण्याचे आवाहनही केले आहे. हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधित करीत होते. वाढत्या जागतिक ऊर्जा खर्चामुळे देशावर आर्थिक दबाव येत असताना, ऐच्छिक खर्चाबाबतही नागरिकांनी पुन्हा विचार करावा, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीवर विशेष भर देत नागरिकांना दैनंदिन जीवनात बदल करण्याचे सुचवले. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर प्रति पिंप सत्तर डॉलरवरून थेट एकशे सव्वीस डॉलरपर्यंत पोहोचल्याने अर्थव्यवस्थेवर मोठा ताण येत आहे. हे संकट टाळण्यासाठी नागरिकांनी खाजगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो रेल्वे आणि सामायिक वाहन प्रवासाचा (कार-पुलिंग) वापर करावा, असे त्यांनी सांगितले.
सोनं खरेदी टाळा, इंधन वापर कमी करा
पुढील एक वर्षभर सोने खरेदी करू नका, असा सल्ला पंतप्रधानांनी जनतेला दिला. घरामध्ये लग्नकार्य किंवा इतर शुभ सोहळे असले तरीही, देशाच्या हितासाठी हा त्याग करण्याचे त्यांनी आवाहन केले. सोन्याच्या आयातीमुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन देशाबाहेर जाते, त्यामुळे या संकटाच्या काळात नागरिकांनी ‘राष्ट्रीय जबाबदारी’ म्हणून सोन्याची खरेदी थांबवावी, असे प्रतिपादन त्यांनी केले. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने ऊर्जा आयातीचा खर्च वाढण्याचा दबाव निर्माण होतो. त्यामुळे देशांतर्गत पातळीवर इंधन वापरातील काटकसर महत्त्वाची ठरते, असा संदेश त्यांच्या आवाहनातून दिसतो.
‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीचा पुनर्विचार
कोरोना महामारीच्या काळात आपण ज्या कार्यसंस्कृतीचा अवलंब केला होता, ती पुन्हा सुरू करण्याची वेळ आली असल्याचे पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले. त्यांनी कंपन्यांना आणि कर्मचाऱ्यांना ‘घरातून काम’ (वर्क फ्रॉम होम) तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) बैठका घेण्याचे आवाहन केले. अनावश्यक प्रवास टाळल्याने केवळ इंधनाचीच बचत होणार नाही, तर परकीय चलनाचीही मोठी साठवणूक होईल. घराबाहेर पडणे टाळून तंत्रज्ञानाचा वापर करणे ही काळाची गरज असून यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्वदेशी पर्यटनाला चालना देण्याचे आवाहन
परदेशातील पर्यटन आणि विवाह सोहळ्यांवर म्हणजेच (डेस्टिनेशन वेडिंगवर पंतप्रधानांनी कडक शब्दात टीका केली. मध्यमवर्गीयांमध्ये अलीकडे परदेशात सुट्ट्या घालवण्यासाठी जाण्याची आणि तिथे विवाह सोहळे आयोजित करण्याची प्रथा वाढत आहे. मात्र, सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात अशा गोष्टी टाळून ‘स्वदेशी’ पर्यटनाला चालना द्यावी, असे त्यांनी सुचवले. परदेशात खर्च होणारे चलन हे देशाचे नुकसान आहे, त्यामुळे पुढील किमान एक वर्ष तरी परदेश दौरे रद्द करावेत, असे आवाहन त्यांनी केले. सीमेवर प्राण अर्पण करणे म्हणजेच केवळ देशभक्ती नसून, देशाच्या आर्थिक हितासाठी अशा छोट्या गोष्टींचा त्याग करणे ही देखील मोठी देशभक्तीच आहे, असे त्यांनी नागरिकांना पटवून दिले.
खाद्यतेल आणि रासायनिक खतांबाबतही आवाहन
अन्न आणि शेती क्षेत्रातील स्वावलंबनावर भाष्य करताना पंतप्रधानांनी खाद्यतेल आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. आपण मोठ्या प्रमाणात खाद्यतेल आयात करतो, त्यामुळे आरोग्यासाठी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी त्याचा वापर मर्यादित ठेवावा, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना उद्देशून त्यांनी रासायनिक खतांचा वापर पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचे आणि नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. तसेच, शेतीसाठी डिझेल पंपांऐवजी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या पंपांचा वापर वाढवण्यावर त्यांनी भर दिला. या संकटकाळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणमधील तणावामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याला तोंड देण्यासाठी प्रत्येक भारतीयाने ‘रुपयाचा रक्षक’ बनावे, असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले.
टॅग्ज: #पंतप्रधानमोदी #इंधनबचत #परकीयचलन #सोनंखरेदी #पश्चिमआशिया #India #EnergyPrices #FuelSavings #WestAsia #Economy