हंटा विषाणूचा धोका अजूनही कायम

हंटा विषाणूच्या संसर्गामुळे चर्चेत आलेल्या एमव्ही हॉन्डियस या आलिशान समुद्री प्रवासी जहाजावरील प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तरी धोका पूर्णपणे टळलेला नसल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी दिला आहे. स्पेनमधील माद्रिद येथे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी परिस्थितीवर अजूनही बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सध्या मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरण्याची चिन्हे नसली तरी विषाणूचा प्रदीर्घ सुप्तकाल लक्षात घेता आगामी काही आठवड्यांत आणखी रुग्ण आढळू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.

एमव्ही हॉन्डियस या डच ध्वजाखालील जहाजावर हंटा विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर तीन जणांचा मृत्यू झाला. अनेक जण संक्रमित झाल्याची नोंद करण्यात आली आहे. हे जहाज दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना येथून अंटार्क्टिकाच्या दिशेने निघाले होते. जहाजावरील रुग्णांमध्ये अँडीज प्रकारातील हंटा विषाणू आढळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकारामध्ये माणसाकडून माणसाकडे मर्यादित प्रमाणात संसर्ग होऊ शकतो. जहाजावरील एकशे वीसहून अधिक प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना स्पेनच्या कॅनरी बेटांमधून बाहेर काढण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने उच्च जोखमीतील व्यक्तींना बेचाळीस दिवस विलगीकरणात ठेवण्याच्या आणि सतत वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. बहुतेक देशांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुरू केले आहे. तरी अमेरिकेने सर्व प्रवाशांना सक्तीचे विलगीकरण आवश्यक नसल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राचे कार्यवाहक प्रमुख जय भट्टाचार्य यांनी परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. मात्र, गेब्रेयसस यांनी सर्व देशांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

या संपूर्ण प्रकरणात अनेक देशांदरम्यान समन्वय साधावा लागला आहे. स्पेन, नेदरलँड्स, दक्षिण आफ्रिका, केप व्हर्डे, युनायटेड किंगडम आणि अर्जेंटिना यांसारखे देश या कारवाईत सहभागी झाले आहेत. सुरुवातीला केप व्हर्डेने जहाज स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे जहाज प्राया किनाऱ्याजवळ उभे ठेवण्यात आले होते. त्यानंतर स्पेनने कॅनरी बेटांमध्ये जहाजाला प्रवेश देत नियंत्रित पद्धतीने प्रवाशांना बाहेर काढण्याची परवानगी दिली. विविध देशांतील आरोग्य यंत्रणा आता जहाजावरील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर वैद्यकीय देखरेख ठेवत आहेत.

भारताचे दोन नागरिक या जहाजावर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. ते सुरक्षित असल्याची माहिती माद्रिद येथील भारतीय दूतावासाने दिली आहे. दोघांमध्ये कोणतीही लक्षणे आढळलेली नसून त्यांना पुढील तपासणी आणि विलगीकरणासाठी नेदरलँड्समध्ये हलविण्यात आले आहे. तज्ज्ञांच्या मते, हंटा विषाणू प्रामुख्याने उंदरांच्या विष्ठा किंवा मूत्रातून पसरतो आणि गंभीर श्वसनविकार निर्माण करू शकतो. तथापि, सध्याची परिस्थिती जागतिक महामारीमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
976 वेळा पाहिलं