गड-किल्ले-समाधी संवर्धनासाठी निधी मंजूर
महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ले, धार्मिक स्थळे आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी राज्य शासनाने एक निर्णय घेतला आहे. यामागे या स्थळांना जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्याचा उद्देश आहे. यात सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याच्या जतन व संवर्धनासाठी एकशे चौतीस कोटी ऐंशी लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संगम माहुली येथील समाधी स्थळ संवर्धन प्रकल्पासाठी एकशे तेहतीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केली.
मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांबाबत शिखर समितीची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सहा महत्त्वाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांना एकूण नऊशे त्र्याण्णव कोटी बहात्तर लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली. बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वनमंत्री गणेश नाईक, तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील गड-किल्ले हे राज्याच्या इतिहासाचे जिवंत प्रतीक आहेत आणि त्यांचे जतन व संवर्धन करणे ही शासनाची प्राथमिकता आहे. या ऐतिहासिक स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असल्याने सुरक्षितता, आरोग्य सेवा, पर्यटन सुविधा आणि आधुनिक सोयी उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच सर्व विकासकामे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.
सातारा शहराच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या अजिंक्यतारा किल्ला परिसराचा सर्वंकष विकास करण्यात येणार आहे. या आराखड्यात किल्ल्याचे जतन, बुरुजांचे पुनरुज्जीवन, राजसदरेचे संवर्धन, अत्याधुनिक लटकता पूल, पर्यटनासाठी आकर्षक स्थळांची निर्मिती, प्रेक्षागृह, नवीन पादचारी मार्ग, परिसर सुशोभीकरण, स्वच्छता सुविधा आणि पर्यटकांसाठी आधुनिक विश्रांतीगृहांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे अजिंक्यतारा किल्ल्याला नवी ओळख मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
याशिवाय सातारा जिल्ह्यातील संगम माहुली समाधीस्थळ संवर्धन प्रकल्पांतर्गत महाराणी ताराबाई भोसले, महाराणी येसुबाई भोसले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधी स्थळांचा जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. तसेच संगमेश्वर मंदिर, घाट परिसर, नवीन लटकता पूल, दर्शन गॅलरी, सुसज्ज पायवाटा आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा उभारण्यात येणार आहेत. या विकासकामांमुळे संगम माहुली परिसराला धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने नवी ओळख मिळणार असल्याची माहिती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली.