यूपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२७ साठी विविध स्पर्धा परीक्षांचे वार्षिक वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, संयुक्त संरक्षण सेवा तसेच अभियांत्रिकी सेवा यांसारख्या महत्त्वाच्या परीक्षा निश्चित तारखांना घेण्यात येणार आहेत. आयोगाने उमेदवारांना नियोजनबद्ध तयारी करता यावी यासाठी हे वेळापत्रक आगाऊ प्रसिद्ध केले आहे. संपूर्ण देशातील लाखो विद्यार्थी या परीक्षांची तयारी करत असल्याने या घोषणेकडे मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे.

भारतीय प्रशासकीय सेवा आणि इतर नागरी सेवांसाठीची प्राथमिक परीक्षा २३ मे २०२७ रोजी होणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा २० ऑगस्ट २०२७ पासून सुरू होणार असून ती पाच दिवस चालणार आहे. या परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय महसूल सेवा आणि इतर केंद्रीय सेवांसाठी अधिकारी निवडले जातात. देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या परीक्षांमध्ये या परीक्षेचा समावेश होत असल्याने उमेदवारांसाठी ही घोषणा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी प्रवेश परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येणार आहे.  यांची पहिली अधिसूचना २ डिसेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २२ डिसेंबर २०२६ राहील. दुसऱ्या टप्प्यातील अधिसूचना १२ मे २०२७ रोजी प्रसिद्ध होणार असून आहे. पहिली परीक्षा ११ एप्रिल २०२७ रोजी तर दुसरी परीक्षा १९ सप्टेंबर २०२७ रोजी होणार आहे. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा देखील याच दिवशी होणार असून संरक्षण दलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जाते. लष्कर, नौदल आणि वायुदलातील अधिकारी पदांसाठी या परीक्षांद्वारे निवड प्रक्रिया पार पडते.

अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षा ३१ जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा 27  जून 2027 रोजी होईल. तसेच संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा, भूवैज्ञानिक सेवा परीक्षा आणि इतर विविध भरती परीक्षांच्याही तारखा आयोगाने निश्चित केल्या आहेत. प्रत्येक परीक्षेची अधिसूचना आणि अर्ज प्रक्रिया स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी अद्ययावत माहिती पाहण्याचे आवाहन केले आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी आयोग प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे वेळापत्रक आगामी दोन वर्षांच्या अभ्यासाचे नियोजन ठरविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
8,622 वेळा पाहिलं