दहा दिवसांत तिसऱ्यांदा इंधन दरवाढ

आंतरराष्ट्रीय बाजारातील वेगाने बदलणाऱ्या घडामोडींमुळे देशात इंधन दरवाढीचा प्रचंड भडका उडाला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि संकुचित नैसर्गिक वायू म्हणजेच सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ केली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दहा दिवसांच्या कालावधीत झालेली ही तिसरी दरवाढ आहे. यामुळे महागाईचा आलेख आणखी उंचावला आहे. सतत होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे.

पेट्रोलच्या दरात प्रति लिटर सत्त्याऐंशी पैसे डिझेलच्या दरात एक्क्याण्णव पैशांपर्यंतची वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात ही प्रति किलो एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसातील ही तिसरी दरवाढ असून जवळपास पाच रुपयांची झळ ग्राहकांच्या खिशाला बसली आहे.

या ताज्या दरवाढीमुळे देशाची राजधानी नवी दिल्लीसह अनेक प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. नवीन बदलानुसार नवी दिल्लीमध्ये संकुचित नैसर्गिक वायूचा दर आता एक्याऐंशी पूर्णांक शून्य नऊ रुपये प्रति किलो इतका झाला आहे. तर नोएडा आणि गाझियाबाद या शहरांमध्ये हाच दर एकोणनव्वद पूर्णांक सत्तर रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. यापूर्वी केंद्र सरकारने पंधरा मे रोजी दोन रुपयांनी आणि त्यानंतर अठरा मे रोजी पुन्हा एक रुपयाने वाढ केली होती. अवघ्या दहा दिवसांत एकूण जवळपास पाच रुपयांची मोठी दरवाढ झाल्यामुळे मालवाहतूक आणि दळणवळणाचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढणार असून, त्याचा थेट फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसणार आहे.

डिझेलचे दर वाढल्यामुळे शेतीचा खर्च आणि मालाची वाहतूक महाग होते. परिणामी, बाजारातील भाजीपाला, फळे आणि जीवनावश्यक अन्नधान्याचे भाव वाढतील.सीएनजीच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे शहरांमधील रिक्षा, टॅक्सी आणि सीएनजीवर चालणाऱ्या बसचे भाडे वाढण्याची दाट शक्यता आहे. कामासाठी किंवा व्यवसायासाठी दररोज दुचाकी अथवा चारचाकीने प्रवास करणाऱ्या नोकरदारांचा मासिक खर्च लक्षणीयरीत्या वाढेल.

देशांतर्गत मालवाहतूक प्रामुख्याने डिझेल गाड्यांवर अवलंबून असते. लागोपाठ झालेल्या दरवाढीमुळे वाहतूक कंपन्या भाडेवाढ करतील, ज्याचा थेट परिणाम कारखान्यांपासून ते किरकोळ दुकानांपर्यंतच्या प्रत्येक वस्तूच्या किमतीवर होईल. कच्चा माल आणणे आणि तयार पक्का माल बाजारात पाठवणे महाग झाल्याने लहान व्यापाऱ्यांचा नफा कमी होईल.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
11,036 वेळा पाहिलं