
चीनमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. देशभरातील सुमारे वीस नद्यांनी धोक्याच्या पातळी ओलांडली आहे. यामध्ये प्रामुख्याने लहान आणि मध्यम आकाराच्या नद्यांचा समावेश आहे. या नैसर्गिक संकटामुळे अनेक सखल भागांमध्ये पुराचे पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान विभागाचा इशारा
चीनच्या हवामान विभागाने आणीबाणीचा इशारा अधिक कडक केला आहे. हवामान खात्याने पावसाचा इशारा चौथ्या पातळीवरून थेट तिसऱ्या पातळीवर नेला आहे. राष्ट्रीय हवामान केंद्राने सकाळीच पावसाचा नारंगी इशारा जारी केला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सातत्यपूर्ण आणि तीव्र पावसामुळे अचानक येणारा पूर, नद्यांना येणारा पूर, भूस्खलन आणि शहरांमध्ये पाणी साचणे अशा अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. डोंगरउतारावर राहणाऱ्या नागरिकांना खालचे मजले सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शाळा आणि उपक्रम स्थगित
मुसळधार पावसाचा फटका दक्षिण चीनमधील ग्वांगडोंग प्रांताला सर्वाधिक बसला आहे. या प्रांतातील गुआंगझू शहरासह अनेक भागांमध्ये सहाशे मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय, डोंगगुआन आणि फुशान सारख्या शहरांमध्ये सर्व प्रकारच्या बाहेरील क्रीडा उपक्रमांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
उत्सवाच्या तयारीवर सावट
ग्वांगडोंग प्रांतातील झुहाई शहरात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांना दारे आणि खिडक्या सुरक्षितपणे बंद ठेवण्यास सांगितले आहे. चीनमध्ये साजरा होणाऱ्या पारंपारिक ड्रॅगन बोट उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या नौका स्पर्धांवरही या हवामानाचे सावट आले आहे. प्रशासनाने या स्पर्धांच्या आयोजकांना आणि नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. हवामानातील या तीव्र बदलांमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत.
इतर राज्यांमध्येही सतर्कता
मुसळधार पावसाचा हा जोर केवळ दक्षिण भागापुरता मर्यादित नसून बीजिंग-तिआनजिन-हेबेई परिसर, लियाओनिंगचा पश्चिम आणि उत्तर भाग, जिलिनचा मध्य भाग आणि हेलॉन्गजियांगच्या दक्षिण भागातही पसरण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये एका तासात तीस ते पन्नास मिलिमीटर, तर दक्षिण चीनच्या काही भागांत नव्वद मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या या पावसामुळे प्रशासनाने संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवली आहे.