पंतप्रधान मोदी – मार्को रुबिओ यांच्यात चर्चा

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेमध्ये भारत-अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला. या बैठकीत संरक्षण, व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, हिंद-प्रशांत क्षेत्रातील सहकार्य तसेच जागतिक घडामोडींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. अमेरिकेने भारताला अत्यंत महत्त्वाचा आणि विश्वासार्ह भागीदार असल्याचे पुन्हा अधोरेखित केले.

मार्को रुबिओ यांचा भारत दौरा अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमीवर होत आहे. जागतिक ऊर्जा संकट, व्यापारविषयक चर्चांचे वातावरण आणि आशिया खंडातील सामरिक बदल यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिका भारताशी संबंध अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. रुबिओ यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आर्थिक सहकार्य, पुरवठा साखळी सुरक्षितता, ऊर्जा पुरवठा आणि संरक्षण क्षेत्रातील भागीदारी वाढविण्यावर विशेष भर दिला.

या दौऱ्यादरम्यान रुबिओ यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी स्वतंत्र द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत हिंद – प्रशांत सागर क्षेत्रातील स्थैर्य, चतुष्कोणी सुरक्षा संवाद (क्वाड) गटाचे सहकार्य, खनिज संसाधने, संरक्षण तंत्रज्ञान आणि जागतिक व्यापार यांसारख्या विषयांवर चर्चा झाली. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी परस्पर सहकार्य अधिक वाढविण्याची भूमिका स्पष्ट केली.

मार्को रुबिओ यांनी भारत दौऱ्याची सुरुवात कोलकाता येथे केली. तेथे त्यांनी मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज ऑफ चॅरिटी’ या सेवाभावी संस्थेला भेट दिली. त्यांच्या सोबत पत्नी जेनेट रुबिओ देखील उपस्थित होत्या. अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गॉर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर ते नवी दिल्ली येथे दाखल झाले. हा दौरा भारत-अमेरिका संबंधांना नवे बळ देणारा मानला जात आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत अधिक व्यापक झाले असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा, तंत्रज्ञान आणि सामरिक सहकार्य या क्षेत्रांत दोन्ही देश एकत्र काम करत आहेत. आगामी चतुष्कोणी सुरक्षा संवाद (क्वाड) गटाच्या बैठकीपूर्वी झालेला हा दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत हा अमेरिकेसाठी आशियातील एक महत्त्वाचा भागीदार असल्याचे मार्को रुबिओ यांनी स्पष्ट केले.

बातमी मिळवा
ई-मेलवर WhatsApp वर
14,128 वेळा पाहिलं